Modi Government Reaction To Donald Trump’s Russian Oil Claim: भारताबरोबर सुरू असलेल्या टॅरिफ वादादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच एक मोठा दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शब्द दिला आहे की भारत रशियन तेल खरेदी थांबवेल. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दाव्यावर केंद्र सरकारने आता अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “भारत हा तेल आणि गॅसचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अशा अस्थिर परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एका निवेदनात म्हटले की, “भारत हा तेल आणि गॅसचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अशा अस्थिर परिस्थितीत भारतीय ग्राहकांचे हित जपणे हे आमचे नेहमीच प्राधान्य राहिले आहे. आमची आयात धोरणे पूर्णपणे ग्राहककेंद्रीत आहेत.”
“तेल व गॅसच्या किमती आणि त्यांचा सुरक्षित पुरवठा निश्चित करणे हे आमच्या ऊर्जा धोरणाची दोन महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. यामध्ये आमच्या ऊर्जा स्रोतांचा विस्तार वाढवणे आणि बाजारातील मागणी पूर्ण करण्यासाठी योग्य ती पावले उचलणे यांचा समावेश आहे”, असे निवेदनात म्हटले आहे.
“अमेरिकेचा विचार केला तर, आम्ही अनेक वर्षांपासून आमची तेल आणि गॅस खरेदी वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या दशकात यात सातत्याने प्रगती झाली आहे. सध्याच्या प्रशासनाने भारतासोबत ऊर्जा सहकार्य वाढवण्यात रस दाखवला आहे. यावर चर्चा सुरू आहे”, असेही निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींनी शब्द दिला
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले होते की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला शब्द दिला आहे की, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवेल. युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत.”
चीनसोबतच्या तणावाच्या काळात भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहता का, असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “ऊर्जा धोरणावरून वाद असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते माझे मित्र आहेत.”