अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी’ प्रकरणात न्यूयॉर्क न्यायालयाने दोषी मानलं आहे. न्यूयॉर्कमधील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ च्या सुमारास न्यायालयाने निकाल सुनावला. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित निकाल आल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार? याचा निर्णय अद्याप न्यायमूर्तींनी घेतलेला नाही. पण या संपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपण निर्दोष असल्याचाच दावा करणाऱ्या ट्रम्प यांची निकालावेळी काय अवस्था झाली होती, याची माहिती आता समोर आली आहे.

पॉर्नस्टार अभिनेत्री स्टॉर्मी डॅनियल्सनं ट्रम्प यांच्याशी आपले पूर्वी संबंध होते, असा धक्कादायक दावा केल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली होती. २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुका अंतिम टप्प्यात असताना या दाव्याला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळू नये, म्हणून ट्रम्प यांनी स्टॉर्मी डॅनियल्सला तब्बल १ लाख ३० हजार डॉलर्स दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. ही रक्कम देण्यासाठी ट्रम्प यांनी आर्थिक गैरव्यवहार केला व त्यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्यामार्फत ती स्टॉर्मी डॅनियल्सला दिल्याचंही या खटल्यात समोर आलं आहे. या खटल्याची प्रदीर्घ सुनावणी झाल्यानंतर शेवटी ट्रम्प दोषी असल्याचं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे.

Donald Trump Convicted: पॉर्नस्टार आरोप प्रकरण दाबण्यासाठी गैरव्यवहार, डोनाल्ड ट्रम्प दोषी सिद्ध; आता उमेदवारीचं काय?

साडेनऊ तास चालली अंतिम सुनावणी!

गुरुवारी तब्बल साडेनऊ तास ट्रम्प यांच्या खटल्यावर अंतिम सुनावणी पार पडली. त्यानंतर ट्रम्प यांच्यावर लावलेल्या सर्व ३४ आरोपांमध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलं. हे सगळं घडत असताना ट्रम्प न्यायालयात पूर्ण वेळ निर्विकार चेहऱ्यानं बसून होते. इंडियन एक्स्प्रेसनं न्यूयॉर्क टाईम्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये सुनावणीनंतर निकालावेळी नेमकं न्यायालयात काय घडलं, यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

पूर्ण सुनावणीत गप्प असणारा फोरमन एकाच शब्दात म्हणाला…

गुरुवारी दिवसभर सुनावणी चालल्यानंतर संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास न्यायमूर्ती हुआन मोर्शान यांनी उपस्थितांना सांगितलं की पुढच्या १५ मिनिटांत ते कामकाज संपल्याचं जाहीर करण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे लगेच निकाल येईल अशी शक्यता मावळली होती. मात्र, काही वेळात ते न्यायालयातून निघून गेले. २० मिनिटांनी न्यायमूर्ती न्यायालयात दाखल झाले. त्यांच्या जागेवर बसले आणि अंतिम निकाल देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर संपूर्ण सुनावणीत शांतच बसलेला न्यायमूर्तींसमोरचा फोरमन उठून उभा राहिला. त्या निकालाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यानं एका शब्दांत ‘दोषी’ (Guilty) असं उत्तर दिलं आणि ट्रम्प यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.

विश्लेषण: ट्रम्प यांच्याविरोधातील ‘हश मनी’ खटला काय आहे? ट्रम्प यामुळे अडचणीत येतील का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण सुनावणीत ट्रम्प निर्विकार चेहऱ्यानं बसून होते. फोरमन उठून उभा राहताच खाली मान घालून बसलेल्या ट्रम्प यांनी फोरमनकडे आशेनं पाहिलं. पण त्यानं ‘दोषी’ हा शब्द उच्चारताच त्यांनी डोळे मिटले आणि खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. यानंतर फोरमनला उर्वरीत ३३ आरोपांबाबतही प्रश्न विचारण्यात आले. त्यावरही त्यानं फक्त एका शब्दांत ‘दोषी’ इतकंच उत्तर दिलं. विशेष म्हणजे, न्यायाधीश कोर्टात आल्यापासून संपूर्ण निकाल सांगण्याची पूर्ण प्रक्रिया अवघ्या दोन मिनिटांत आटोपली!