Donald Trump Meet Elon Musk at Charlie Kirk Funeral : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद चालू आहेत. मात्र, हे दोघेही कन्झर्व्हेटिव्ह कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी एकत्र दिसले. दोघेही शेजारी बसून गप्पा मारत असल्याचं पाहून अनेकांच्या भुवया उंचवाल्या. दोघांमध्ये राजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच हे दोघे एकत्र दिसले आहेत. मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरहून या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यासह मस्क यांनी For Charlie (चार्लीसाठी) असं कॅप्शन दिलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संसदेत सादर केलेल्या ‘बिग ब्युटीफुल बिलवरून मस्क व ट्रम्प यांच्यात खडाजंगी झाली होती. मस्क यांनी या विधेयकावर जोरदार टीका केली होती. तसेच त्यांनी ट्रम्प यांच्याविरोधात स्वतःच्या पक्षाची स्थापना देखील केली आहे. या विधेयकामुळे अमेरिकेतील लाखो नोकऱ्या जातील आणि देशाचे मोठे धोरणात्मक नुकसान होईल. इतकेच नाही, तर मस्क यांनी हे विधेयक पूर्णपणे वेडेपणाचे आणि विध्वंसक असल्याची टिप्पणी केली होती.

मस्क व ट्रम्प यांच्या पॅचअपची चर्चा

गेल्या काही दिवसांमध्ये ट्रम्प व मस्क यांच्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र, चार्ली कर्क यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी दोघांमध्ये संवाद संवाद झाला. हा संवाद पाहून दोघांमध्ये पॅचअप झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.

ट्रम्पविरोधात मस्क यांच्या पक्ष

ट्रम्प यांच्याशी झालेल्या वादानंतर मस्क हे सरकारमधून बाहेर पडले. तसेच त्यांनी स्वतःच्या नवीन पक्षाची स्थापना केली आहे. मस्क यांनी त्यांच्या पक्षाचं नाव ‘अमेरिका पार्टी’ असं ठेवलं आहे.

चार्ली कर्क यांच्यावरील अंत्यसंस्कारावेळी मस्क व ट्रम्प एकत्र आले

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते ३१ वर्षीय चार्ली कर्क यांची ११ सप्टेंबर रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. उटाह येथील एका महाविद्यालयात एका कार्यक्रमात भाषण करत असतानाच कर्क यांच्यावर गोळीबार झाला. ट्रम्प यांना तरुण मतदारांमध्ये असलेला पाठिंबा मजबूत करण्याचं श्रेय कर्क यांना दिलं जातं. ते टर्निंग पॉइंट या उजव्या विचारसरणीच्या संघटनेचे सह-संस्थापक होते. रविवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.