Shahbaz Sharif Meets Donald Trump at White House: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांशी असलेल्या मैत्रीबाबत अनेकदा उल्लेख केला आहे. दोघांच्या भेटींचे फोटोदेखील नेहमीच हसतमुख असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, सध्या टॅरिफबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या भारतविरोधी भूमिकेमुळे भारत व अमेरिका यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. पण एकीकडे भारताबाबत उघडपणे विरोधी भूमिका घेणाऱ्या ट्रम्प यांचं पाकिस्तानशी सख्य वाढू लागल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने पाकिस्तानशी व्यापारविषयक करार केल्यानंतर आता पाकिस्तानचे पंतप्रधान व लष्कर प्रमुखांनी थेट व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्याचं समोर आलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल सय्यद आसिम मुनीर हे गुरुवारी व्हाईट हाऊसचे विशेष अतिथी होते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोघांशी सविस्तर चर्चादेखील केली. विशेष म्हणजे जवळपास एक तास डोनाल्ड ट्रम्प यांनी तासभर शाहबाज शरीफ यांच्याशी बंद दाराआड चर्चा केल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. भारताबाबत भूमिका कठोर करणाऱ्या ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत मात्र मवाळ भूमिका घेतल्याचं दिसत आहे. दरम्यान, या भेटीमागचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

द्विपक्षीय संबंध घट्ट करण्याचे प्रयत्न?

अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय ठरू शकते. जुलै महिन्यात अमेरिकेनं पाकिस्तानशी व्यापारविषयक करार केल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय संबंधांच्या अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पाकिस्तानचा तेलसाठा विकसित करण्यासंदर्भात प्रामुख्याने या करारातील तरतुदींमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

गुरुवारच्या भेटीआधीही दोन दिवसांपूर्वी २३ सप्टेंबर रोजी शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली होती. इस्लामिक अरब देशांच्या नेत्यांशी ट्रम्प यांनी केलेल्या चर्चेनंतर दोघांमध्ये हा संवाद झाला. यासंदर्भात पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाकडून सोशल मीडियावर माहिती देण्यात आली होती.

शरीफ – पुतिन भेटीचा व्हिडीओ व्हायरल!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चीनमध्ये पार पडलेल्या SCO परिषदेच्या ठिकाणी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबतचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवरून शरीफ यांना प्रचंड ट्रोलही करण्यात आलं होतं. या व्हिडीओमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुतिन यांच्याशी शरीफ यांची ओळख करून देणं टाळलं होतं. मात्र, नंतर शरीफ स्वत:च पुतिन यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी रांग मोडून पुढे आले होते.

पाकिस्तानची रशियाशी जवळीक वाढू नये, म्हणून डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला चुचकारत असल्याचं सांगितलं जात आहे. भारतावरही रशियाकडून तेल खरेदी करू नये, यासाठी अमेरिकेकडून दबाव टाकला जात असून ही मागणी मान्य करावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लादलं आहे.