Social Media Memes Goes Viral After Donald Trump Misses Nobel Peace Prize 2025: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, आपण जगातील अनेक युद्धे शांततेच्या मार्गाने थांबवल्याचा दावा करत आपल्यालाच या वर्षीचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा अशी इच्छा सातत्याने व्यक्त करत होते. याचबरोबर अनेक देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांना हा पुरस्कार मिळावा म्हणून पाठिंबाही दिला होता. पण नॉर्वेजियन नोबेल समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत मारिया कोरिना मचाडो यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

डोनाल्ड ट्रम्प यांना डावलत मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल पुरस्कार मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांची खिल्ली उडवणारे हजारो मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये अनेक भारतीय युजर्सचाही समावेश आहे.

ट्रम्प पाकिस्तानशी का मैत्री करत होते?

भारतीय उद्योगपती हर्ष गोयंका यांनीही ‘एक्स’वर एक मीम शेअर करत ट्रम्प यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी शेअर केलेल्या मीममध्ये ट्रम्प, “जर सर्व प्रयत्न निष्फळ ठरले, तर नोबेल पारितोषिक समितीवर बॉम्ब टाका आणि शांततेचा नोबेल पुरस्कार चोरून आणा”, असे म्हणत असल्याचे दाखवले आहे.

हर्ष गोयंका यांनी याला, “ट्रम्प पाकिस्तानशी का मैत्री करत होते? मोहसिन नक्वी यांनी आशिया कप कसा चोरला हे शिकण्यासाठी का? आता ट्रम्प यांनी शांततेचा नोबेल पुरस्कार गमावला आहे, पाकिस्तानी युक्ती उपयोगी पडू शकते!” असे कॅप्शन दिले आहे.

स्वतःच नोबेल शांतता पुरस्कार सुरू करतील

शांततेच्या नोबेल पुरस्कार विजेत्याचे नाव जाहीर झाल्यानंतर एका युजरने ‘एक्स’वर पोस्ट केली की, “ट्रम्प नोबेल पारितोषिक समितीवर आता १०० टक्के कर लादण्याची शक्यता आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “जेव्हा ट्विटरने ट्रम्प यांचे अकाउंट हटवले, तेव्हा त्यांनी स्वतःचे खाजगी सोशल नेटवर्क तयार केले. आता ते स्वतःच स्टार्स-अँड-स्ट्राइप्स नोबेल शांतता पुरस्कार सुरू करतील आणि स्वतःला पहिला विजेता म्हणून घोषित करतील!”

सत्य परेशान हो सकता है, किंतु पराजित नहीं

यावेळी आणखी एका ‘एक्स’ युजरने, हिंदीतील “सत्य परेशान हो सकता है, किंतु पराजित नहीं”, असे म्हणत ट्रम्प यांची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.

ऑस्कर आणि नोबेल पुरस्कार खरेदी करता येत नाहीत

पुढे नोबेल पुरस्कार आणि ऑस्कर पुरस्काराचे महत्त्व सांगत, एक युजर म्हणाला की, “डोनाल्ड ट्रम्प यांना यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार मिळेल अशी आशा होती. त्यांनी वारंवार दावे केले आहेत की, त्यांनी युक्रेन-रशिया युद्ध आणि भारत-पाकिस्तान युद्ध थांबवले. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना या पुरस्कारासाठी पात्र मानले गेले नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमने यासाठी खूप प्रयत्न केले होते. यावरून पुन्हा एकदा हे सिद्ध झाले आहे की, ऑस्कर आणि नोबेल पुरस्कार खरेदी करता येत नाहीत. जे खरोखरच यासाठी पात्र असतात, त्यांनाच ते मिळतात.”

कोण आहेत मारिया कोरिना मचाडो?

२०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार व्हेनेझुएलाच्या नेत्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला आहे. त्या एक प्रसिद्ध राजकीय नेत्या आहेत. त्यांनी त्यांच्या देशात लोकशाही आणि मानवी हक्कांसाठी सातत्याने लढा दिला आहे. मारिया कोरिना यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी व्हेनेझुएलाची राजधानी कराकस येथे झाला. त्यांचे वडील हेन्रिक मचाडो हे एक उद्योगपती होते आणि तिची आई कोरिना पॅरिस्का या मानसशास्त्रज्ञ होत्या.