Donald Trump Nobel Prize News: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेल पारितोषकासाठी प्रयत्नशील होते. यासाठी त्यांना जागतिक पातळीवर काही नेत्यांचा पाठिंबाही मिळाला होता. मोठ्या प्रमाणात लॉबिंग करूनही डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा पुरस्कार मिळाला नाही. त्यांच्याऐवजी व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना मचाडो यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प सातत्याने आठ युद्धे थांबवल्याचा दावा करत होते. आठ युद्ध थांबवूनही माझी दखल घेतली जात नाही, अशी खंत त्यांनी अनेकदा व्यक्त केली. तसेच नोबेल पुरस्कार मिळण्यासाठी त्यांनी काही देशांचा पाठिंबाही मिळवला होता. इस्रायल आणि हमास यांच्यातील शांतता कराराची घोषणा केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना नोबेल पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षा होती.

इस्रायल-हमास यांच्यातील शांतता करारामुळे दोन वर्षांपासून सुरू असलेला गाझामधील रक्तरंजित संघर्ष अखेर थांबला. या करारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न केले होते. तसेच मे महिन्यात भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठीही मी प्रयत्न केले, असा दावा त्यांनी अनेकवेळा केला. मात्र भारताने या दाव्याला कधीही मान्यता दिली नाही.

मला फार पूर्वीच नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता, असाही दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. तसेच कालच ते म्हणाले की, बराक ओबामा यांना काही न करता हा शांतता पुरस्कार कसा काय मिळाला होता? रिपब्लिकन नेत्यांनाही अपेक्षा होती की, यंदा ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार मिळेल, पण त्यांचा हिरमोड झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल का मिळाला नाही?

डोनाल्ड ट्रम्प यांना २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार न मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे नामांकन कटऑफ तारखेनंतर आले होते. यावर्षीच्या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणारे नामांकन १ फेब्रुवारीपूर्वी करायची होते.

ट्रम्प यांचा युद्ध थांबविल्याचा दावा आणि काही देशांनी त्यांना पाठिंबा दिल्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांना पुरस्कार का मिळू शकला नाही? याबद्दल नॉर्वेजियन नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन फ्रायडनेस यांना विचारले असता ते म्हणाले की, हा निर्णय अल्फ्रेड नोबेल यांनी व्यक्त केलेल्या इच्छा आणि संबंधित व्यक्तीच्या कार्यावर अवलंबून असतो.

नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नोबेल समितीचे अध्यक्ष जॉर्गेन फ्रायडनेस यांनी सांगितले की, नोबेल पुरस्काराच्या आतापर्यंतच्या इतिहासात समितीने अनेक प्रचार मोहिमा आणि माध्यमात चालणारी चर्चा पाहिली आहे. दरवर्षी आम्हाला हजारो पत्र प्राप्त होतात, ज्यात लोक त्यांच्या शांततेच्या कार्यासंबंधीची माहिती देतात. अशावेळी समिती अतिशय धैर्य आणि सचोटी दाखवून निर्णय घेत असते. आमचा निर्णय हा अल्फ्रेड नोबेल यांनी दाखवून दिलेल्या मार्गावर आणि त्यांच्या कामावर आधारित असतो.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, नोबेल पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी सांगितले की, समिती तात्काळ राजकीय विजयांपेक्षा शांततेसाठीच्या शाश्वत प्रयत्नांना अधिक महत्त्व देते. हेन्री जॅक्सन सोसायटीचे इतिहास तज्ज्ञ आणि संशोधक थियो झेनो यांनी सांगितले की, ट्रम्प यांचे प्रयत्न अद्याप दीर्घकाळ टिकणारे असल्याचे सिद्ध झालेले नाही.

झेनो यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, थोड्या काळासाठी लढाई थांबवणे आणि संघर्षाची मूळ कारणे सोडवणे यात खूप अंतर आहे.

ट्रम्प यांच्या हवामान बदलाबाबत नकारात्मक भूमिकेवरही झेनो यांनी बदल टाकला. हवामान बदल हा पृथ्वीवरील सध्याच्या घडीचा सर्वात मोठा प्रश्न असून ते आपल्यासमोरील दीर्घकालीन थांततेचे आव्हान आहे, असे नोबेल समितीचे मत असल्याचेही झेनो यांनी सांगितले.

तसेच इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू आणि पाकिस्तान सरकारने १ फेब्रुवारीच्या मुदतीनंतर शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांना पाठिंबा देणारे नामांकन भरले होते, याकडेही लक्ष वेधले जात आहे.