India will benefit from Trump’s tariffs on 14 countries: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ७ जुलै रोजी १४ देशांवर नवीन टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतल्याने भारतीय निर्यातदारांना अमेरिकेत निर्यात होणाऱ्या कापड आणि विद्युत यंत्रसामग्रीसारख्या क्षेत्रांमध्ये निर्यात वाढवण्याची संधी मिळू शकते, ज्यावर पारंपरिकपणे दक्षिण कोरिया, बांगलादेश, म्यानमार आणि इंडोनेशियाचे वर्चस्व आहे. मनीकंट्रोलच्या विश्लेषणानुसार, जर भारताने अमेरिकेशी मिनी व्यापार करार केला किंवा कमी टॅरिफसाठी वाटाघाटी केल्या, तर या देशांमधून अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीपैकी १० टक्क्यांहून अधिक निर्यातीला भारत आव्हान देऊ शकतो.
दक्षिण कोरियावर अमेरिकेने २५ टक्के टॅरिफ लादले आहे. यामुळे भारताच्या वाट्याला दक्षिण कोरियाची ५.४ अब्ज डॉलर्सची निर्यात येऊ शकते, जी अमेरिकेला होणाऱ्या त्यांच्या एकूण निर्यातीच्या अंदाजे ११.५ टक्के आहे. यामध्ये इलेक्ट्रिक इन्व्हर्टर, बॅटरी चार्जर, व्हॉल्व्ह आणि टॅप्स यांचा समावेश आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या टॅरिफमुळे भारताचे शेजारी देशही असुरक्षित आहेत. बांगलादेशाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, ट्रम्प यांनी लागू केलेल्या टॅरिफमुळे भारतीय निर्यातदारांच्या वाट्याला बांगलादेशच्या १.३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तूंची निर्यात येऊ शकते. यामध्ये कापड क्षेत्राचा प्रामुख्याने समावेश आहे. बांगलादेशातून अमेरिकेला टी-शर्ट, जर्सी आणि पुरुषांचे शर्ट यासारख्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात निर्यात होते.
म्यानमारचा विचार केला, तर अमेरिकेला होणाऱ्या ७५० दशलक्ष डॉलर्सच्या निर्यातीपैकी २५ टक्क्यांहून अधिक निर्यात भारताला मिळू शकते. इंडोनेशियन निर्यातीला भारताकडून विशेषतः मोडेम आणि कपड्यांमध्ये तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागू शकते.
जर भारत अमेरिकेसोबत मिनी व्यापार करार करू शकला किंवा वाटाघाटीद्वारे टॅरिफ कमी करू शकला, तर मलेशियाच्या निर्यातीपैकी जवळजवळ १५ टक्के आणि कंबोडियाच्या १३.४ टक्के निर्यातीला भारताकडून स्पर्धेचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, टॅरिफ लागू करण्यात आलेल्या १४ देशांपैकी भारताला फक्त जपान आणि थायलंडशी स्पर्धा करता येऊ शकत नाही. २०२४ मध्ये जपानची अमेरिकेला एकूण निर्यात ६२ अब्ज डॉलर्स इतकी होती.
काल, सोमवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशांवर अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर जास्त टॅरिफ लागू शकते अशा देशांची यादी जाहीर केली. ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, अनेक देशांना पत्रे पाठवण्यात आली आहेत. या पत्रांमध्ये त्यांना इशारा देण्यात आला आहे की, जर १ ऑगस्टपर्यंत नवीन व्यापार करार झाले नाहीत, तर वाढीव टॅरिफ लागू केले जाईल.