Donald Trump on Pakistan-Afghanistan War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आंतरराष्ट्रीय स्तरावर तंटा मुक्ती अध्यक्ष बनले आहेत की काय? अशी परिस्थिती दिसत आहे. आपण आतापर्यंत आठ युद्धे थांबवली असल्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा एकदा केला आहे. तसेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू झालेला सशस्त्र संघर्ष आपण चुटकीसरशी थांबवू शकतो, असा दावा त्यांनी केला आहे. हा संघर्ष थांबवून ते जगातील नववे युद्ध थांबवू शकतात, असेही ते म्हणाले आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पत्रकारांनी पाकिस्तानच्या अफगाणिस्तानवरील ताज्या हल्ल्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना ते म्हणाले, “पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हल्ले केले आहेत, हे मला समजले. हा संघर्ष सोडविणे माझ्यासाठी अतिशय सोपे काम आहे. मला अमेरिकेचा कारभार हाकायचा आहे. दरम्यान जगात चाललेली युद्ध थांबवायलाही मला आवडतात.”
भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा पुन्हा एकदा दावा
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान सशस्त्र संघर्ष सोडवल्याचा दावा केला. दोन अण्वस्त्रधारी देशांच्या संघर्षात मध्यस्थी करून मी शांतता प्रस्थापित केली, याचा उल्लेख ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. भारताने ट्रम्प यांच्या दाव्याला कधीही दुजोरा दिला नाही. भारत-पाकिस्तानच्या डीजीएमओंनी त्यांच्या स्तरावर चर्चा करून शस्त्रविराम केला होता, अशीच भूमिका भारताने आजवर मांडली आहे.
नोबेल मिळाला नाही तरी…
जगातील आठ युद्धे थांबवूनही नोबेल शांतता पुरस्कार मिळाला नाही, याबद्दल ट्रम्प यांनी खंत व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, माझी कामगिरी अभूतपूर्व अशी होती.
“मी आजवर आठ युद्धे सोडवली. मी रवांडा आणि कांगोलाही गेलो. भारत-पाकिस्तानचे बघा. मला जेव्हा जेव्हा युद्ध सोडविण्याची संधी मिळते, तेव्हा मी शांतता आणण्याचा प्रयत्न करतो आता मी नववे युद्धही थांबवू शकतो.” हे युद्ध थांबवले तर तुम्हाला नोबेल मिळू शकेल? असाही एक प्रश्न यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आला.
पाहा व्हिडीओ –
#WATCH | US President Trump says, "I solved eight wars. Go to Rwanda and the Congo, talk about India and Pakistan. Look at all of the wars that we solved, and every time I solved, when they say If you solve the next one, you're gonna get the Nobel Prize. I didn't get a Nobel… pic.twitter.com/EWDq3EgApZ
— ANI (@ANI) October 17, 2025
मला लोकांचे जीव वाचविण्यात रस…
या प्रश्नावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “मला नोबेल पारितोषिक मिळाले नाही. ते कोणत्यातरी चांगल्या महिलेला मिळाले. मला माहीत नाही ती महिला कोण आहे. पण ती नक्कीच चांगली असेल. मी या गोष्टींची पर्वा करत नाही. मी फक्त युद्ध थांबवून असंख्य लोकांचा जीव वाचवतो. होय, आता मी नववे युद्धही थांबवू शकतो.”