Donald Trump Tariff Big Blow to India Viral news: कधी कधी साध्यासुध्या, लहानशा खेड्यांतही अचंबित करणाऱ्या कथा दडलेल्या असतात. तेलंगणातील ही गोष्ट त्यापैकीच एक. मात्र, इथलं हे देवस्थान कुठल्याही पारंपरिक देवतेसाठी नसून, हजारो किलोमीटर दूर राहणाऱ्या एका व्यक्तीसाठी आहे. शेतकरी बुस्सा कृष्ण यांनी २०१८ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वप्नात पाहिलं आणि त्यानंतर त्यांच्या प्रती अढळ श्रद्धा जोपासत, स्वतःचं पूजाघर मंदिरात रूपांतरित केलं. त्यांनी ट्रम्प यांचा फोटो प्रतिष्ठापित करून रोज पूजन करण्यास सुरुवात केली.
ट्रम्पकृष्ण आहे तरी कोण?

अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निर्यातीवर२५+२५ असं एकूण ५०% आयात शुल्क लावल्याच्या निर्णयामुळे त्या विषयाची चर्चा पुन्हा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांना समर्पित केलेल्या भारतातील मंदिराची पुन्हा एकदा नव्याने चर्चा होत आहे.

२०१९ पर्यंत शेतकरी बुस्सा कृष्ण यांची ट्रम्पप्रतीची आवड इतकी वाढली होती की, त्यांनी सुमारे २ लाख रुपये खर्च करून आपल्या घराबाहेर डोनाल्ड ट्रम्प यांचा सहा फूट उंच पुतळा उभारला. या पुतळ्याला हार घालून, दुधाने अभिषेक करून पूजा केली जात असे. त्यामुळे त्यांचं घर स्थानिक पातळीवर एक वेगळ्या आकर्षणाचं केंद्र ठरलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार कृष्ण यांनी आपल्या घराच्या भिंतींवर ट्रम्प यांची चित्रं आणि पोस्टर्स लावली आहेत. त्यामुळेच गावात ते ‘ट्रम्प कृष्ण’ म्हणून ओळखले जातात.

ट्रम्प यांची पूजा पारंपरिक हिंदू पूजेसारखीच होत होती. कुंकू, आरती, फुलं अशा सर्व विधींनी पूजन केलं जातं होत. आश्चर्य म्हणजे, ते नेहमी ट्रम्प यांचा फोटो बरोबर ठेवत होते, त्यांचे फोटो असलेले टी-शर्ट घालत आणि कठीण प्रसंगी उपवास करत. ट्रम्प यांना कोविड-१९ झाल्यावर त्यांनी डोळ्यात पाणी आणत त्यांच्यासाठी प्रार्थना करणारा व्हिडिओही पोस्ट केला होता.

दुर्दैवाने, २०२० साली वयाच्या फक्त ३३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने कृष्णा यांचा मृत्यू झाला. ट्रम्प यांच्या आजारपणामुळे त्यांना तीव्र चिंता आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागत होता. ज्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला होता.

त्यांच्या निधनानंतरही हे मंदिर तसंच राहीलं. पुढील काही वर्षांत, विशेषतः ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयांनंतर, गावकरी आणि नातेवाईक यांनी पुन्हा या मंदिरात जाऊन पुतळा स्वच्छ केला, हार घातला आणि त्यांच्या स्मरणार्थ पूजा सुरू केली.

ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर तब्बल ५०% आयात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे, कारण भारताने रशियाकडून तेल खरेदी न करण्याचा मार्ग स्वीकारला. या धोरणाचा भारतीय हितसंबंधांवर थेट आणि गंभीर परिणाम झाला. परिणामी, अनेकांच्या दृष्टीने हे मंदिर उपरोधिक तर काहींच्या मते लाजिरवाणं ठरलं आहे. आर्थिक तोट्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्याला ‘चुकीच्या भक्तीचं प्रतीक’ अशी संबोधण्यात आलं आहे. आता प्राप्त परिस्थितीत या मंदिराचे भवितव्य काय याची चर्चा रंगली आहे.