Donald Trump warns India of Secondary Sanctions: भारतीय आयातीवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादल्यानंतर काही तासांतच, डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये आणखी २५ टक्के टॅरिफ लादत तो एकूण ५० टक्के केला आहे. याचबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांनी, भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारतावर आणखी दुय्यम निर्बंध लादण्याचा इशाराही दिला आहे.
भारतालाच का एकटे टाकले जात आहे?
दरम्यान, चीनसारखे देश रशियन तेल खरेदी करत असताना भारतालाच का एकटे टाकले जात आहे, असे विचारले असता ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले की, “फक्त आठ तास झाले आहेत. पुढे काय होईल ते पाहा. तुम्हाला बरेच काही पाहायला मिळेल. तुम्हाला अनेक दुय्यम निर्बंध लादलेले पाहायला मिळतील.”
आम्ही ते नंतर ठरवू…
युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियाशी आर्थिक संबंध तोडण्यासाठी अनेक देशांवर अमेरिकेचा दबाव वाढत असताना ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे. ओव्हल ऑफिस कार्यक्रमादरम्यान रशिया आणि युक्रेनमधील संभाव्य शांतता करारामुळे भारतावरील अतिरिक्त शुल्क काढून टाकता येईल का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, “आम्ही ते नंतर ठरवू.”
काल (बुधवारी), व्हाइट हाऊसने एक कार्यकारी आदेश जारी केला ज्यामध्ये भारतीय आयातीवर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे भारतावरील एकूण टॅरिफ आता ५० टक्के झाला आहे. सुधारित टॅरिफ २७ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
भारताकडून ‘अयोग्य’ टॅरिफचा निषेध
डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा भारताने तीव्र निषेध केला आणि ते “अयोग्य, अन्याय्य आणि अवास्तव”, असल्याचे म्हटले आहे.
“अलिकडच्या काळात अमेरिकेने रशियातून होत असलेल्या भारताच्या तेल आयातीला लक्ष्य केले आहे. आम्ही या मुद्द्यांवर आमची भूमिका आधीच स्पष्ट केली आहे, ज्यामध्ये आमची आयात बाजार घटकांवर आधारित आहे आणि भारतातील १.४ अब्ज लोकांची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने रशियन तेलाची आयात केली जाते”, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
“भारत आपल्या राष्ट्रीय हितांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. अमेरिकेचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच तो परस्पर आदर आणि धोरणात्मक भागीदारीच्या तत्त्वांच्या विरोधात आहे”, असेही त्यात म्हटले आहे.
भारताने राष्ट्रीय हित, ऊर्जा सुरक्षा आणि स्पर्धात्मक किंमतीचा हवाला देत रशियासोबत ऊर्जा संबंध राखण्याच्या आपल्या अधिकाराचे सातत्याने समर्थन केले आहे.