Trump Warns India about Massive Tariffs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर मोठ्या प्रमाणा टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. भारताने रशियन तेल आयात करणे थांबवले नाही तर त्यांना मोठ्या कराचा सामना करावा लागू शकतो, असे ताजे विधान ट्रम्प यांनी केले आहे. एअर फोर्स वन या ट्रम्प यांच्या विदेश दौऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विमानात पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी हे विधान केले. ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी मला सांगितले होते की, ते रशियन तेलाची आयात थांबवतील. पण ते जर तेल घेणे थांबवणार नसतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावले जाईल.”

पंतप्रधान मोदींशी झालेल्या संभाषणाचा दावा भारत सरकारने फेटाळून लावल्याबद्दलही डोनाल्ड ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले, “त्यांना (भारत सरकार) जर असे म्हणायचे असेल तर मी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅरिफ आकारत राहिले आणि ते तसे करू इच्छित नाहीत.”

मागच्या आठवड्यात बुधवारी (१५ ऑक्टोबर) व्हाईट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्याचा दावा केला होता. भारत हळूहळू रशियन तेलाची आयात थांबवणार असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितल्याचे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही, भारत हळूहळू तेल घेणे बंद करेल, असेही ते म्हणाले.

फोनवरून चर्चा झाल्याचा दावा भारताने फेटाळला

डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा झाल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच भारताने हा दावा खोडून काढला होता. अमेरिकी अध्यक्षांनी केलेल्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले की मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही दूरध्वनी संवाद झालेला नाही. ‘‘भारत तेल आणि नैसर्गिक वायूचा एक महत्त्वाचा आयातदार आहे. अस्थिर ऊर्जा परिस्थितीत भारतीय ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे यालाच सरकारचे प्राधान्य राहिले आहे,’’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

स्थिर ऊर्जेच्या किमती आणि सुरक्षित पुरवठा सुनिश्चित करणे हे भारताच्या ऊर्जा धोरणाचे दुहेरी उद्दिष्ट राहिले आहे. बाजारपेठेतील परिस्थिती पूर्ण करण्यासाठी योग्य ते विविधीकरण करण्यात येत आहे,’’ असे जयस्वाल यांनी सांगितले. भारत अमेरिकेबरोबरही ऊर्जा संबंध वाढवण्याचा विचार करत आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या आयातीमुळे युक्रेन युद्धाला निधी

भारताच्या तेल आयातीमुळे रशियाला मोठ्या प्रमाणात पैसा मिळतो आणि तो रशियाकडून युक्रेन युद्धासाठी वापरला जातो, असा आरोप ट्रम्प सुरुवातीपासून करत आले आहेत. भारत त्यांचे एक तृतीयांश तेल रशियाकडून आयात करतो, असे सांगून ट्रम्प ही आयात थांबविण्यासाठी भारत आणि इतर देशांवर दबाव टाकत आले आहेत.