डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नेल्सन मंडेला यांच्याशी लालूप्रसाद यादव यांनी स्वतःची तुलना करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठीचे योगदान प्रचंड मोठे आहे. तुम्ही चारा घोटाळाप्रकरणात दोषी ठरलेले आहात. भ्रष्टाचाराबाबत तुम्हाला शिक्षा सुनावली जाणार आहे हे विसरू नका, असे खडे बोल केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी लालूप्रसाद यादव यांना सुनावले आहेत. प्रसारमाध्यमांसमोर तुम्ही निर्दोष असल्याचा दावा करता.  मात्र या देशासाठी योगदान दिलेल्या बाबासाहेब आंबेडकरांशी स्वतःची तुलना बंद करा. स्वतःची तुलना आंबेडकरांशी करून लालूप्रसाद यादव यांनी आंबेडकरांचा अपमान केला आहे असाही आरोप पासवान यांनी केला.

रेल्वेमंत्री म्हणून लालूप्रसाद यादव देशभरात प्रसिद्ध होते. मात्र यूपीएसोबत त्यांच्या पक्षाची युती ही फक्त भ्रष्टाचारासाठी होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पैशांशिवाय कशाला महत्त्व दिले? असाही प्रश्न पासवान यांनी उपस्थित केला. न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे त्यांनी घोटाळा केला ही बाब उघड आहे. आता त्यांना शिक्षा काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नेल्सन मंडेला, मार्टिन लुथर किंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही प्रयत्न फसले होते. आजही या सगळ्यांची देशाच्या इतिहासातील प्रतिमा खलनायक अशी आहे. त्यांनी जातीयता पसरवली असा आरोप त्यांच्यावर होतो. अशा आशयाचा एक ट्विट लालूप्रसाद यादव यांनी केला होता. याच ट्विटला रामविलास पासवान यांनी सडेतोड उत्तर देऊन लालूप्रसाद यादव यांनी इतिहासातील महापुरुषांचा अपमान केल्याचेही म्हटले आहे.