पीटीआय, जयपूर : सनातन धर्माच्या विरोधात बोलणाऱ्यांची जीभ हासडू आणि सनातनकडे वटारले जाणारे डोळे उपटून काढू, अशी धमकीची भाषा केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी दिली आहे. राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यात एका पोटनिवडणुकीदरम्यान भाजपच्या परिवर्तन यात्रेतील शेखावत यांच्या भाषणाची ही दृश्यफीत समाजमाध्यमांवर प्रसृत झाली आहे.
तमिळनाडूतील युवक कल्याणमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी अलीकडेच सनातन धर्माबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावर शेखावत म्हणाले की, स्टॅलिन यांचे हे आव्हान आम्ही स्वीकारतो. आमची संस्कृती आणि इतिहासावर केलेले हे आक्रमण आहे. सनातन धर्माविरोधात बोलणारी कोणतीही व्यक्ती या देशात राजकीय आणि सत्तास्थानी राहू शकत नाही. या भाषणात त्यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही टीका केली.
मोदी पुन्हा जिंकले तर सनातन धर्म ताकदवान होईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाल्याचा दावा शेखावत यांनी केला. गेल्या दोन हजार वर्षांत अल्लाउद्दीन खिल्जी, औरंगजेब यांच्यासारख्या अनेक आक्रमकांनी देशाची संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती जपली. या पूर्वजांची शपथ घेऊन सनातन धर्मावरील हल्ला खपवून घेणार नसल्याचे शेखावत म्हणाले.
काँग्रेसची टीका
शेखावत यांची भाषा दहशतवाद्यांसारखी आहे, अशी टीका काँग्रेस नेते रशिद अल्वी यांनी केली आहे. अशी भाषा वापरणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणीही त्यांनी केला. त्याच वेळी अल्वी यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्या सनातन धर्माबाबत विधानाचाही निषेध केला.