केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ‘उडत्या बस’ची संकल्पना मांडली होती. हा प्रकल्प पुण्यात आणण्यासाठी केंद्र सरकार निधी द्यायला तयार आहे, महापालिकेनं तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावा, असं नितीन गडकरी म्हणाले होते. यानंतर आता नितीन गडकरी यांनी हवेतून धावणाऱ्या ‘डबल डेकर’ बसची नवीन संकल्पना सूचवली आहे.

मुंबईतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईत हवेत उडणारी डबल डेकर बस हवी, यावर आमचं संशोधन सुरू आहे, असं गडकरी म्हणाले. आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करताना गडकरींनी ही संकल्पना मांडली आहे. देशात ई-हायवे तयार करण्याचा सरकारचा संकल्प असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

यावेळी नितीन गडकरी म्हणाले, देशात मास रॅपिड ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीचा वापर वाढला पाहिजे. बंगळुरुत प्रचंड वाहतूक कोंडी आणि प्रदूषण आहे. त्यावेळी मी तिथल्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं, आमच्याकडे एक प्रेझेंटेशन झालं आहे. त्यामध्ये हवेत चालणाऱ्या डबल डेकर बसची संकल्पना मांडली आहे. अशीच बस आपल्या मुंबईत पाहिजे. अशी बस तयार करण्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. यामुळे एकाच वेळी दोनशे लोक वरच्या वर हवेतून प्रवास करू शकतील, असंही गडकरी म्हणाले.

हेही वाचा- पुण्यात उडत्या बसेसची योजना! वाहतुकीच्या समस्येवर गडकरींचा रामबाण उपाय!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा बसमुळे तुम्ही पवईतून डोंगरावरून थेट नरीमन पॉईंटला हवेतून जाऊ शकता. यामुळे तुमचा प्रवास सुलभ होईल आणि वेळही वाचेल. वाहतूक व्यवस्थेत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा, असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.