संसदेच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याचा सरकारी कार्यक्रम दरवर्षी पार पडतो. या कार्यक्रमाला यंदा सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह व्ही. भागैय्या यांनादेखील आमंत्रण दिले आहे. दलित समाजाला संघाकडे आकर्षित करण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून भाजपने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आघाडी घेतली. यंदाही देशभरात भाजप आणि संघातर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संसदेतील सरकारी कार्यक्रमाला थेट संघनेत्यांना आमंत्रण दिल्याने संघाने आता दलित समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.
संघाचे सहकार्यवाह व्ही. भागैय्या हे संघाच्या सामाजिक समरसता या अभियानाचे प्रमुख आहे. हिंदू धर्मातील जातीभेद नष्ट करणे हे या अभियानाचे उद्दीष्ट आहे. एक मंदिर, एक स्मशानभूमी आणि एक विहीर असे या अभियानाचे धोरण आहे. या अभियानाला यश मिळाल्याचे संघाचे नेते सांगतात. संघाने अभियान राबवलेल्या अनेक गावांमध्ये आता जातीभेद नाही. गावातील मंदिरांमध्ये दलितांनाही प्रवेश असतो. तर सणासुदीच्या काळात संघाचे कार्यकर्ते दलित कुटुंबांसोबत उत्सव साजरा करतात असे संघातील एका नेत्याने सांगितले. जातीभेद नष्ट करण्यासाठी बराच वेळ लागेल, पण त्याची सुरुवात होणे गरजेचे आहे याकडेही एका नेत्याने लक्ष वेधले. संघाने दलित समाजाशी जवळीक साधल्याचे परिणाम उत्तर प्रदेशमध्येही दिसून आले होते. राज्यात मुस्लिम उमेदवार न देताही भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. आता संघाने दक्षिणेकडील जातीभेदावर लक्ष केंद्रीत करण्याची तयारी केली आहे.
जातीभेदाविरोधात लढा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ जयंती साजरी करण्यासाठी केंद्र सरकारनेही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात असून ते दीक्षाभूमी येथे जाऊन आंबेडकरांना अभिवादन करतील.