केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती. अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नागेश्वरन हे आयएफएमआर ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन म्हणूनही राहिले आहेत. त्यांनी अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमधून आपलं पदव्युत्तर पदविकेचं शिक्षण पूर्ण केलं आहे. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातून त्यांनी त्यांची डॉक्टरेट पूर्ण केली आहे.