झारखंडमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तब्बल ९ ठिकणी छापे टाकले आहेत. यामध्ये झारखंड सरकारमधील एका मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला असून यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. याबरोबरच काही अभियंत्यांच्या घरीही ईडीने छापेमारी केली असल्याची माहिती समोर येत आहे. लोकसभा निवडणूक सुरु असतानाच ईडीने केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे झारखंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे खासगी सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरी ईडीने छापेमारी केली. यावेळी तब्बल २० कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. या २० कोटी रुपयांची मोजणी करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरु असून पैसे मोजण्यासाठी काही मशीन्स मागवण्यात आल्याची माहिती सांगितली जात आहे. मंत्र्याच्या खासगी सचिवाच्या नोकराच्या घरी एवढी मोठी रोकड सापडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा : ‘टेप रेकॉर्डरसारखे काम करू नका’; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयांवर ताशेरे, सरकारी वकिलांबाबतही मांडली ‘ही’ भूमिका

झारखंड ग्रामीण विकास विभागाच्या काही योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. यामध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या संदर्भात ईडीकडून तब्बल छापेमारी करण्यात आली. तर याच प्रकरणात ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना २२ फेब्रुवारी २०२३ मध्ये अटक करण्यात आली होती. आताही वीरेंद्र राम यांच्या संबंधित काही ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. आलमगीर आलम हे पाकूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच सध्या ते झारखंड सरकारमध्ये त्यांच्याकडे ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. तसेच २००६ ते २००९ या दरम्यान ते झारखंड विधानसभेचे अध्यक्षही होते. आलमगीर आलम हे चारवेळा आमदर म्हणून निवडून आलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सगळीकडे सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असून प्रचाराच्या दरम्यान राजकीय नेते आपल्या भाषणात भष्ट्राचाराच्या मुद्यांवरही बोलताना पाहायला मिळत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झारखंडमध्ये एक सभा पार पडली होती. या सभेत बोलताना त्यांनी भष्ट्राचाराच्या मुद्यांवर भाष्य केले होते. यानंतर आता ईडीने झारखंडमध्ये मोठी कारवाई केली आहे.