या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : महाराष्ट्रात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कारवायांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. प्रामुख्याने संजय राऊत यांच्या मालमत्ता जप्तीचा मुद्दा उपस्थित करत ‘ईडी’च्या कारवाया अन्यायकारक असल्याचे पवार यांनी मोदींना सांगितल़े  मोदी-पवार भेटीमुळे दिल्लीसह महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले होते. मात्र, ‘राज्यातील सरकार भक्कम असून, आगामी विधानसभा निवडणुकीतही तिन्ही घटक पक्ष एकत्र लढतील’, असा निर्वाळा पवार यांनी दिला.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन घटक पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याआधी शरद पवार यांनी मोदी यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली होती. त्यानंतर गेल्या वर्षी सहकार क्षेत्राशी निगडीत प्रश्नांसंबंधी पवारांनी मोदींची भेट घेतली होती. मात्र, राज्यातील ‘ईडी’च्या वेगवान कारवायांच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले होत़े. पंतप्रधानांच्या संसदेतील कार्यालयात २० मिनिटे त्यांनी मोदींशी चर्चा केली. त्यावेळी लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार महम्मद फैजल हेही उपस्थित होते. लक्षद्वीपचे प्रशासक म्हणून प्रफुल के. पटेल यांनी कारभार हाती घेतल्यापासून तिथे त्यांची एकाधिकारशाही सुरू आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रामुख्याने मोदींची भेट घेतल्याची माहिती पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त करण्याच्या ‘ईडी’च्या कारवाईबद्दल पवार यांनी पत्रकार परिषदेत कमालीची नाराजी व्यक्त केली. राऊत यांच्याविरोधातील कारवाईचा मुद्दा मोदींच्या भेटीत उपस्थित केल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. संजय राऊत यांच्याविरोधात कारवाई करण्याची काय गरज होती? ते  भाजपवर कठोर टीका करतात म्हणून त्यांची संपत्ती जप्त करण्याची ईडीची कारवाई अन्यायकारक असल्याचे पवार म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीचे अलिबागमधील भूखंड व दादरमधील सदनिका ईडीने जप्त केली आह़े

मंत्रिमंडळ बदलाबाबत संदिग्धता

राज्याच्या मंत्रिमंडळातील बदलांची चर्चा होत असली तरी, त्यावर पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला. हा मुद्दा मुंबईत घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित होत असतो. मला फक्त राष्ट्रवादी काँग्रेसमधील स्थिती माहिती असून पक्षात कोणतेही बदल केले जाणार नाहीत, असे पवार म्हणाले. काँग्रेसच्या आमदारांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या कारभाराबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रारी केल्या असल्याच्या मुद्दय़ावर पवार म्हणाले की, आघाडीतील एखादा पक्ष नाराज असेल तर हे सरकार अस्थिर होईल़ मात्र, आघाडीच्या बैठकांमध्ये तरी काँग्रेसने नाराजी व्यक्त केलेली नाही. तीनही पक्षांनी भाजपविरोधात लढण्याचा निर्धार केला असल्याने राज्य सरकारला कोणताही धोका नाही, असे पवार म्हणाले.

यूपीएचे अध्यक्षपद सोनियांकडेच!

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षपदाची सातत्याने चर्चा होत असली तरी, ‘हे पद स्वीकारण्याची माझी तयारी नाही. ‘यूपीए’मध्ये असलेली विद्यमान व्यवस्थाच कायम राहिली पाहिजे’, असे पवार म्हणाले. गेल्या आठवडय़ात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या दिल्लीत झालेल्या कार्यक्रमामध्ये पवारांनी ‘यूपीए’चे अध्यक्ष व्हावे, असा ठराव पवार यांच्या उपस्थितीत संमत केला होता. मात्र, काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे ‘यूपीए’चे अध्यक्षपद कायम राहणार असल्याचे पवार यांनी सूचित केले. बिगरभाजप पक्षांनी एकत्र येण्यासंदर्भात तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी आग्रही असून त्यांच्याशी चर्चा करू, असेही पवार यांनी सांगितले.

विधान परिषदेतील रिक्त जागांचा मुद्दा

‘‘विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागा गेल्या दोन वर्षांपासून रिक्त असून, हा मुद्दाही मोदींच्या कानावर घातला आहे. राज्य सरकारने या नियुक्त्यासंदर्भात राज्यपालांना पत्रे लिहिली आहेत. संभाव्य सदस्यांची यादीही दिली आहे. मात्र, हा प्रश्न निकाली काढला जात नाही, असा मुद्दा मोदींपुढे मांडला’’, असे पवार यांनी सांगितले.

‘मलिक, देशमुखांबाबत चर्चा नाही’

राज्यातील मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्याविरोधातही ‘ईडी’ आणि सीबीआय या केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केली आहे. या नेत्यांवरील कारवाईबद्दल विचारले असता, त्यांच्याबद्दल मोदींशी चर्चा केली नाही, असे पवार यांनी सांगितले. पण, केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करणार असतील तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यावी लागेल, असेही पवार म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed complaint pm modi sharad pawar talked about action against sanjay raut ysh
First published on: 07-04-2022 at 01:30 IST