नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना ८ जून रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. याबाबत बोलताना काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आम्ही झुकून सामना करणार नाही. सिंघवी म्हणाले की, सोनिया गांधी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील.

गांधी परिवाराविरोधात ईडीने समन्स बजावल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी याबाबत भाष्य केले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले, “ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणातील कटाचा एक भाग म्हणून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटीस पाठवली आहे. पण आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही… छाती ठोकून  लढणार.”

त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आरोप केला आहे की, “यापूर्वी ईडीने हे प्रकरण बंद केले होते. भाजपा राजकीय विरोधकांना धमकवण्यासाठी बाहुल्या असलेल्या सरकारी तपास यंत्रणांचा वापर करत आहेत.”

यापूर्वी १२ एप्रिल रोजी काँग्रेस नेते पवन बन्सल यांची नॅशनल हेराल्डशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली होती. त्याच्याकडून आर्थिक व्यवहारांसह अनेक बाबींवर चौकशी करण्यात आली.

इतर नेत्यांवरही आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, दिवंगत नेते मोतीलाल व्होरा, पत्रकार सुमन दुबे आणि टेक्नोक्रॅट सॅम पित्रोदा यांच्यावर आरोप केले होते. यंग इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून ते चुकीच्या पद्धतीने विकत घेतले गेले आणि काँग्रेस नेत्यांनी २,००० कोटी रुपयांपर्यंतची मालमत्ता जप्त केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास ईडीने २०१४ मध्ये सुरू केला होता. यंग इंडिया लिमिटेडचा उद्देश नफा कमावणे हा नसून ती चॅरीटीसाठी स्थापन करण्यात आली आहे, असे या प्रकरणावर काँग्रेसचे म्हणणे आहे