ED on Anil Ambani YES Bank Money Laundering Case: ३,००० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी आणि येस बँकेशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी छापे टाकले. ५० कंपन्या आणि सुमारे २५ व्यक्तींचा समावेश असलेल्या मुंबई आणि दिल्लीतील ३५ हून अधिक ठिकाणांवर मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) छापे टाकण्यात येत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एएनआय वृत्तसंस्थेने एका अधिकृत सूत्राचा हवाला देत म्हटले आहे की, “सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर, ईडीने रागा कंपन्यांनी (रिलायन्स अनिल अंबानी ग्रुप ऑफ कंपनीज) केलेल्या कथित मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याची चौकशी सुरू केली आहे. इतर एजन्सी आणि संस्थांनीही ईडीला या प्रकरणांबाबत माहिती दिली आहे. ईडीच्या प्राथमिक तपासात बँका, भागधारक, गुंतवणूकदार आणि इतर सार्वजनिक संस्थांची फसवणूक करून सार्वजनिक पैसे लुबाडण्याची एक सुनियोजित योजना उघड झाली आहे. येस बँक्स लिमिटेडच्या प्रवर्तकासह बँक अधिकाऱ्यांना लाच देण्याच्या गुन्ह्याचीही चौकशी सुरू आहे.”
एएनआय वृत्तसंस्थेने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, “प्राथमिक तपासात येस बँकेकडून सुमारे ३००० कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज वळवल्याचे (२०१७ ते २०१९ या कालावधीत) उघड झाले आहे. कर्ज मंजूर होण्यापूर्वी येस बँकेच्या प्रवर्तकांना त्यांच्या खात्यात पैसे मिळाल्याचे ईडीला आढळून आले आहे.”
ईडी लाच आणि कर्ज यांच्यातील संबंधाची चौकशी करत आहे. येस बँकेने रागा कंपन्यांना दिलेल्या कर्ज मंजुरींमध्ये ईडीला गंभीर उल्लंघन आढळले आहे, जसे की क्रेडिट अप्रूवल मेमोरँडम जुन्या तारखेचे होते, कोणत्याही योग्य क्रेडिट विश्लेषणाशिवाय गुंतवणूक प्रस्तावित केली गेली होती, जी बँकेच्या क्रेडिट धोरणाचे उल्लंघन आहे, असे वृत्तही एएनआयने दिले आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ अंतर्गत ईडीने आज सुरू केलेल्या शोध मोहिमेत ३५ हून अधिक ठिकाणे, ५० कंपन्या आणि २५ हून अधिक व्यक्तींचा समावेश आहे.
२०२३ मध्येही, अनिल अंबानी यांच्या ८०० कोटी रुपयांच्या कथित अघोषित परदेशातील मालमत्तेप्रकरणी आयकर विभागाच्या चौकशीत उघड झालेल्या फेमा उल्लंघनाच्या संदर्भात ईडीने त्यांची चौकशी केली होती.