बेतिया (बिहार) : बिहारमध्ये विषारी दारू प्यायल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. दारूबंदी असलेल्या बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तेल्हुआ गावातील सर्व पीडित रहिवाशांनी बुधवारी संध्याकाळी चामरटोली परिसरात दारू प्यायली होती, असा दावा स्थानिकांनी केला आहे. परंतु पोलिसांनी अद्याप या दाव्याला दुजोरा दिलेला नाही.

सर्व आठ मृतांची ओळख पटली आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणाचा तपशील जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. प्राथमिक तपासानंतरच अधिक माहिती मिळेल, असेही त्यांनी सांगितले. एका गावकऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ‘दारू प्राशन केल्यावर लोक अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार करू लागले. त्यांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. गुरुवारी सकाळी या आठही जणांचा मृत्यू झाला. इतरांवर सध्या विविध स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.’ गेल्या महिन्यात मुझफ्फरपूरमध्ये अशाच एका घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. नितीश कुमार सरकारने ५ एप्रिल २०१६ रोजी राज्यात दारूचे उत्पादन, व्यापार, साठवणूक, वाहतूक, विक्री आणि सेवनावर बंदी घातली होती.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी विषारी दारूमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीका केली. झा यांनी ट्वीट केले की, ‘मुख्यमंत्रीजी, हे तुमच्या दारूबंदीचे सत्य आहे. पण तुम्ही काळजी करू नका आणि चिंतनही करू नका. काहीही करून निवडणूक जिंकून या. बाकीचे जनतेला भोगू द्या, कुटुंब उद्ध्वस्त होऊ द्या, तुम्हाला काय?’

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight killed in bihar after drinking poisonous liquor akp
First published on: 05-11-2021 at 00:06 IST