Illegal Old-Age Home: उत्तर प्रदेशातील नोएडा येथे विनापरवाना सुरू असलेल्या वृद्धाश्रमातून ४२ वृद्ध नागरिकांची सुटका करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. याठिकाणी वृद्धांना अतिशय हीन वागणूक दिली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी छापा टाकला होता. या छाप्यात काही वृद्ध महिलांना बांधून ठेवल्याचे दिसले. तर काही वृद्धांना तळघरात बंद करून ठेवले होते.
उत्तर प्रदेश राज्य महिला आयोग आणि राज्य कल्याण विभागाच्या सदस्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी नोएडाच्या सेक्टर ५५ मधील आनंद निकेतन वृद्ध सेवा आश्रमात छापा टाकला, तेव्हा जिवंतपणी नरकयातना भोगत असलेल्या वृद्धांची स्थिती समोर आली.
महिला आयोगाच्या सदस्या मिनाक्षी भराला यांनी सांगितले की, सेक्टर ५५ मध्ये अवैध वृद्धाश्रम सुरू असल्याची माहिती मिळाली होती. याठिकाणी वृद्धांना बांधून ठेवल्याचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. सदर कथित व्हिडीओ आनंद निकेतन वृद्ध सेवा आश्रमातील असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर याठिकाणी छापा टाकण्यात आला.
भराला यांनी पुढे सांगितले की, छाप्यादरम्यान एक वृद्ध महिला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. तर इतर वृद्धांना तळघरात डांबून ठेवले होते. काही पुरूषांच्या अंगावर कपडेही नव्हते. तर अनेक वृद्ध महिलांनी अर्धवट कपडे परिधान केले होते.
पोलिसांनी आश्रम संचालकांना संस्थेच्या नोंदणीची कागदपत्रे दाखविण्यास सांगितले. मात्र संचालकाला कोणतेही ठोस उत्तर देता आले नाही. सदर वृद्धाश्रम १९९४ पासून कोणत्याही नोंदणीशिवाय कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
भराला पुढे म्हणाल्या की, वृद्धाश्रमातील तीन वृद्धांना शुक्रवारी समाज कल्याण विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वृद्धाश्रमात हलवले जाईल. तसेच उर्वरित वृद्धांना पुढील पाच दिवसांत इतर शासकीय वृद्धाश्रमात हलविण्यात येईल. तसेच प्रशासनाच्या मदतीने सदर बेकायदेशीर वृद्धाश्रमाला टाळे ठोकण्यात येईल.
विशेष म्हणजे, या वृद्धश्रमातील वृद्द हे नोएडातील श्रीमंत कुटुंबांतील असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात दिली आहे. वृद्धांच्या नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळूनही त्यांना योग्य सुविधा दिल्या जात नसल्याचे या प्रकारावरून समोर आले आहे.