ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केला जात आहे अशी ओरड होत असतानाच निवडणूक आयोगाने वैज्ञानिक, संशोधक, तंत्रज्ञांना खुले आवाहन दिले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करुन ईव्हीएम घोटाळा करता येतो का हे सिद्ध करुन दाखवा असे आव्हान निवडणूक आयोगाने दिले आहे.
EC planning an open challenge for scientists, technologist & political parties in first week of May to prove temperability of EVMs. pic.twitter.com/6GWySRuRfa
— ANI (@ANI) April 12, 2017
ज्या व्यक्तींना असे वाटते की ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार करता येते त्यांनी सर्वांनी यावे आणि सर्वांसमक्ष ईव्हीएममध्ये काही बदल करता येतात की नाही ते सिद्ध करुन दाखवावे असे त्यांनी म्हटले आहे. मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे वृत्त एएनआयने दिले आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या शक्तीचा दुरुपयोग करुन ईव्हीएममध्ये फेरफार करुन निवडणूक जिंकल्याचा आरोप मायावती यांनी सर्वप्रथम केला होता. त्यानंतर काँग्रेस पक्षातील काही नेत्यांनीही त्यांचीच री ओढली. अरविंद केजरीवाल यांनी देखील पंजाबमधील पराभवाचे खापर ईव्हीएमवरच फोडले होते.
ईव्हीएममध्ये कुठलाही बदल करता येणे अशक्य आहे असे त्यावेळी निवडणूक आयोगाने केजरीवालांना म्हटले होते. तुमच्या पराभवाची कारणे तुम्ही शोधा आमच्यावर दोषारोप करू नका असे त्यांनी म्हटले होते. माजी निवडणूक आयुक्त कुरेशी यांनी देखील ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार करता येत नाही असे म्हटले होते. भिंडमध्ये मतदानापूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये कुठलेही बटन दाबले असता दोन वेळा भाजपची, एक वेळा काँग्रेसची आणि एक वेळा इतर पक्षाची पावती आली होती. त्यामुळे देखील गदारोळ निर्माण झाला होता. हे मशीन सेट करण्यात आले नव्हते. आता ते सेट झाले आहे असे देखील निवडणूक निर्णय अधिकारी सलोनी सिंह यांनी म्हटले होते. या प्रकाराची गंभीर दखल आयोगाने घेतली होती. यामध्ये काही गैरप्रकार झाला नव्हता असे आयोगाने स्पष्ट केले होते.