वृत्तसंस्था, पाटणा
बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक नवीन उपक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी दिली. हे उपक्रम नंतर देशभरातही राबवले जातील असे त्यांनी सांगितले. राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह सुखबीर सिंग सिंधू आणि विवेक जोशी हे इतर दोन आयुक्त शनिवारी आणि रविवारी बिहारच्या दौऱ्यावर होते.
बिहारमध्ये विधानसभेचे २४३ मतदारसंघ असून, सध्याच्या विधानसभेची मुदत २२ नोव्हेंबरला संपत आहे. त्यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. राज्यात राबवण्यात आलेल्या मतदारयाद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीमुळे (एसआयआर) मतदारयाद्या शुद्ध झाल्या असे ज्ञानेश कुमार म्हणाले.
दोन दिवसांचा दौरा आटोपता घेण्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ज्ञानेश कुमार यांनी नवीन उपक्रमांची माहिती दिली. त्यामध्ये नवीन मानक कार्यप्रणालीचा (एसओपी) समावेश आहे. त्यानुसार, मतदारांची नोंदणी केल्यापासून १५ दिवसांच्या आत ईपीआयसी कार्ड वितरीत केले जातील. तसेच, मतदारांना मतदान केंद्रांवर मोबाइल फोन तात्पुरते जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या सध्याच्या १,५००हून कमी करून १,२०० इतकी केली जाईल. यापूर्वी मतदानाच्या अखेरच्या तासामध्ये लांब रांगा लागत असत. ती गर्दी टाळण्यासाठी आणि प्रतीक्षा वेळ कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे ज्ञानेश कुमार म्हणाले. राज्यात वेळेवर मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोग सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व २४३ मतदारसंघांमध्ये आमचे निवडणूक नोंदणी अधिकारी (ईआरओ) आहेत. एसआयआर उपक्रम पूर्ण करण्यासाठी या ईआरओंना ९०,२०७ मतदान केंद्र पातळी अधिकाऱ्यांनी (बीएलओ) मदत केली. एसआयआरमुळे २२ वर्षांनी मतदारयादी शुद्ध झाली आहे. – ज्ञानेश कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त
‘एसआयआर’च्या नावाने घोटाळा – काँग्रेस
नवी दिल्ली : बिहारमध्ये २०२०च्या निवडणुकीत ज्या ५९ ठिकाणी अटीतटीच्या लढती झाल्या तिथे ‘एसआयआर’अंतर्गत मतदारांची नावे मोठ्या प्रमाणात हटवल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ‘एसआयआर’मध्ये राज्यातील २३ लाख महिला मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने ‘एसआयआर’च्या नावावर मोठा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी रविवारी केला.