पीटीआय, नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने शनिवारी २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारींची नियुक्ती केली. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांनी या नियुक्त्या केल्याचे पक्षाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.भाजपकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारची जबाबदारी देण्यात आली असून राज्यसभेचे खासदार आणि झारखंडचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक प्रकाश हे सहप्रभारी असतील. तावडे यांच्याकडे सध्या बिहारच्या राजकीय घडामोडींचे प्रभारी ही जबाबदारी आहे.
वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर केरळचे निवडणूक प्रभारी असतील. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करणारे गुजरातचे माजी आमदार पूर्णेश मोदी यांच्याकडे दमन आणि दीवची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हेही वाचा >>>राजकीय गदारोळात विनोद तावडे बिहारमध्ये दाखल, भाजपा नितीश कुमारांना समर्थन देणार?
निवडणूक प्रभारी : राधा मोहन दास – कर्नाटक, आशीष सूद – गोवा, अशोक सिंघल – अरुणाचल प्रदेश, वाय सत्य कुमार – अंदमान आणि निकोबार, तरुण चुघ – जम्मू व काश्मीर आणि लडाख, विजयपाल सिंह तोमर – ओडिशा, निर्मला कुमार सुराणा – पुद्दुचेरी, दिलीप जयस्वाल – सिक्कीम, अरविंद मेनन – तमिळनाडू, श्रीकांत शर्मा – हिमाचल प्रदेश, दुष्यंत कुमार गौतम – उत्तराखंड, बिप्लब कुमार देब – हरियाणा. जय पांडा – उत्तर प्रदेश, लक्ष्मीकांत बाजपेयी – झारखंड, मंगल पांडय़े – पश्चिम बंगाल, महेंद्र सिंह – मध्य प्रदेश, विजय रुपानी – पंजाब आणि चंडीगड.
सह-प्रभारी : सुधाकर रेड्डी – कर्नाटक, दुष्यंत पटेल – दमण आणि दीव, लता उसेंडी – ओडिशा, निरदर सिंह – पंजाब, संजय टंडन – हिमाचल प्रदेश, सुरेंद्र नागर – हरियाणा, अमित मालवीय आणि आशा लाक्रा – पश्चिम बंगाल, सतीश उपाध्याय – मध्य प्रदेश.