शक्तिशाली रशियाच्या हल्ल्यांमुळे उद्ध्वस्त होत असलेल्या युक्रेनला आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्कने मदतीचा हात दिला आहे. रशियाने युक्रेनची संपर्क यंत्रणा बेचिराख केलेली असताना युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांनी एलोन मस्कला मदतीची विनंती केली. यानंतर आता एलोन मस्क यांनी मोठा निर्णय घेत युक्रेनला मदतीचा हात दिला आहे. यानुसार आता मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने स्टारलिंक ही आपली अत्याधुनिक ब्रॉडबँड सेवा युक्रेनमध्ये सुरू केली आहे.

एलोन मस्क यांनी स्वतः युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्र्यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत युक्रेनमध्ये स्टारलिंक सेवा सुरू केल्याची माहिती दिली. युक्रेनच्या मंत्र्यांनी मदतीची मागणी केल्यानंतर १० तासात एलोन मस्क यांनी युक्रेनमध्ये ही सेवा सुरू झाल्याचं कळवलं.

युक्रेनच्या मंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलं होतं?

युक्रेनच्या डिजीटल ट्रान्सफॉर्मेशन मंत्री म्हणाले होते, “तुम्ही मंगळ ग्रहावर वसाहत तयार करण्याचा प्रयत्न करत असताना इथं रशिया युक्रेनवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुमचे रॉकेट यशस्वीपण अंतराळात स्थिरावत असताना रशिया युक्रेनच्या नागरिकांवर हल्ला करत आहे. आम्ही युक्रेनला तुमच्या स्टारलिंक स्टेशनची सेवा देण्याची विनंती करतो.”

युक्रेनसाठी एलोन मस्क यांची ही मदत महत्त्वाची का?

रशियाने युक्रेनला नमवण्यासाठी केवळ जमिनीवरील सैन्य कारवाईच केलेली नाही, तर युक्रेनची डिजीटल यंत्रणा उद्ध्वस्त करून चारही बाजूने कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. याचाच भाग म्हणून रशियाकडून युक्रेनच्या इंटरनेट सेवा आणि ब्रॉडबँड सेवा देणाऱ्या यंत्रणा देखील उद्ध्वस्त केल्या जात आहेत. असं झाल्यास युक्रेनचा उर्वरित जगाशी संपर्कच तुटून जाईल आणि युक्रेनला कोणतीही मदत मिळणार नाही, असाही प्रयत्न होत असल्याचं जाणकार सांगत आहेत. त्यामुळेच युक्रेनच्या मंत्र्यांनी थेट एलोन मस्क यांना मदतीची विनवणी केली.

हेही वाचा : “युक्रेनमधील भारतीयांना काहीही होणार नाही”, रशियाचे अध्यक्ष पुतीन यांचा मोदींना शब्द

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टारलिंक काय आहे?

स्टारलिंक स्पेसएक्सच्या २,००० हून अधिक उपग्रहांच्या समुहाचं संचालन करणारं अंतराळातील स्टेशन आहे. संपूर्ण पृथ्वीवर इंटरनेट सेवा पुरवणे हा या स्टेशनचा उद्देश आहे.