Elon Musk Political Party : उद्योगपती एलॉन मस्क यांनी नुकतीच नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘अमेरिका पार्टी’ असं मस्क यांच्या राजकीय पक्षाचं नाव आहे. या पक्षाच्या माध्यमातून एलॉन मस्क हे आता राजकीय मैदानात उतरत डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मात्र, एलॉन मस्क यांनी पक्ष काढल्यानंतर त्यांना मोठ्या आर्थिक तोट्याला समोरं जावं लागलं आहे.
एलॉन मस्क यांनी पक्षाची घोषणा केल्यानंतर त्यांना १.३ लाख कोटींचा तोटा झाला आहे. टेस्लाचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरले असून तब्बल १.३ लाख पाण्यात गेले आहेत. एलॉन मस्क यांनी पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केल्यानंतर टेस्लाच्या गुंतवणुकदारांच्या अस्वस्था निर्माण जाल्यामुळे टेस्लाच्या शेअर्समध्ये तब्बल ७ टक्क्यांची घसरण झाली आहे.
दरम्यान, मस्क आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील वादाचा टेस्लाला फटका बसत आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या चिंता वाढल्याल्याचं बोललं जात आहे. टेस्लाचे शेअर्स झपाट्याने कोसळले आहेत. यातच ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयांचाही परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर झाल्याचं दिसून आलं आहे. मस्क यांची कंपनी टेस्लाच्या शेअर्समध्येही मोठी घसरण नोंदवण्यात आली. या संदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.
मस्क आता ट्रम्प यांना आव्हान देणार?
ट्रम्प आणि मस्क हे अमेरिकेतील प्रभावशाली व्यक्तिमत्त्वं आहेत. दोघांनीही आपआपल्या क्षेत्रात यशाची शिखरे गाठलेली आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राजकारणात ऐतिहासिक पुनरागमन केलं, तर एलॉन मस्क यांनी ४२० अब्ज नेटवर्थसह तंत्रज्ञान, अवकाश, सोशल मीडिया आणि इलेक्ट्रिक वाहन अशा अनेक उद्योगांमध्ये आपले वर्चस्व निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे या दोघांकडेही स्वत:च्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. ट्रम्प यांच्याकडे ‘ट्रुथ सोशल’, तर इलॉन मस्क यांचे जगभरात ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) आहे.
दोघेही एकमेकांवर कोरडे आसूड ओढत आहेत. यातच आता मस्क हे राजकीय मैदानात उतरणार असल्यामुळे ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाद आणखी वाढण्याची चिन्हं निर्माण झालं असून मस्क आता ट्रम्प यांना राजकीय मैदानात आव्हान देण्याची शक्यता आहे. मस्क यांनी नुकतीच ‘अमेरिका पार्टी’ नावाच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा केलेली आहे. मात्र, या पक्षाच्या घोषनेनंतर मस्क यांचं काही प्रमाणात नुकसानही होत आहे.