अर्थसंकल्पात सरकारचा दावा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशात बेरोजगारी वाढली असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्र सरकारच्या खात्यात ३.७९ लाख नवीन रोजगार २०१७-२०१९ दरम्यान निर्माण झाल्याचा दावा सरकारने केला आहे. सरकारने २०१९-२० च्या अर्थसंकल्पात हा दावा केला असून केंद्र सरकारच्या आस्थापनात २०१७ ते २०१८ या काळात २५१२७९ रोजगार निर्माण झाल्याचे म्हटले असून ही रोजगार संख्या १ मार्च २०१९ पर्यंत ३७९५४४ ने वाढून ३६१५७७० होण्याची शक्यता आहे. हंगामी अर्थमंत्री पीयूष गोयल यांनी १ फेब्रुवारीला मांडलेल्या अर्थसंकल्पात ही माहिती देण्यात आली आहे.

काँग्रेस व विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांना बेरोजगारीच्या प्रश्नावर घेरले असताना ही आकडेवारी महत्त्वाची असून सरकारने बेरोजगारी वाढल्याचे किंवा अपेक्षित रोजगार निर्मिती न केल्याचे आरोप फेटाळले आहेत. राष्ट्रपतींच्या भाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय पेन्शन योजना, प्राप्तिकर विवरणपत्रे, वाहनांची विक्री यातील माहितीनुसार संघटित व असंघटित क्षेत्रात तसेच वाहतूक, हॉटेल व पायाभूत सुविधा क्षेत्रात रोजगार वाढल्याचा दावा केला आहे.

रेल्वे, पोलिस दल, कर खाते या विभागात कर्मचारी भरती करण्यात आली असून केंद्र सरकारच्या अनेक आस्थापनात रोजगार निर्मिती झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. रेल्वेत ९८९९९ , पोलिस खात्यात ७९३५३, प्रत्यक्ष कर विभागात ८०१४३, अप्रत्यक्ष कर विभागात ५३३९४, हवाई वाहतूक क्षेत्रात २३६३, टपाल खात्यात ४२१०६८ , परराष्ट्र खात्यात ११८७७ रोजगार १ मार्च २०१९ अखेर निर्माण होतील असा दावा सरकारने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employment in india
First published on: 11-02-2019 at 00:19 IST