जम्मू काश्मीरमधील बांदिपोरामध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले आहेत. जवानांवर हल्ला करुन दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर लष्कराच्या जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. बांदिपुरामधील शाहगुंड हाजी परिसरात पहारा देणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळते आहे.

शाहगुंड हाजी परिसरातील लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये काही वेळ चकमक झाली. शाहगुंड हाजी हा परिसर बांदिपोरा जिल्ह्यात येतो. लष्कर ए तोयबाचा एक दहशतवादी काही दिवसांपूर्वीच एन्काऊंटरमध्ये मारला गेला. यासोबतच आणखी एका चकमकीत काश्मीर खोऱ्यातील इंजिनियरिंगचा विद्यार्थी असलेल्या आणि नुकत्याच लष्कर दहशतवादी संघटनेत सामील झालेल्या एका तरुणाला भारतीय लष्कराने टिपले होते. लष्कराचे जवान आणि पोलीस यांच्या या संयुक्त कारवायांच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांकडून हा करण्यात आला असल्याची दाट शक्यता आहे.

भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वीच २५ वर्षीय दहशतवादी अबू बकेरला कंठस्नान घातले. अबू बकेर लष्कर ए तोयबाचा विभागीय कमांडर होता. अबूला टिपण्यात आल्याने लष्कर ए तोयबाला मोठा धक्का बसला आहे. सोपोरमधील एन्काऊंटरमध्ये लष्कराच्या जवानांनी अबू बकेरला कंठस्नान घातले होते.