इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन हा आजवर अनेकदा भारतात येऊन गेला आहे. मग तो इंग्लंड क्रिकेट टीमचा भारत दौरा असो किंवा मग आयपीएलचे सामने असोत. केविन पीटरसननं भारतात अनेक ठिकाणी प्रवास केला आहे. अनेकदा त्यानं भारतात येणं आवडत असल्याचं देखील सांगितलं आहे. पण आता पुन्हा एकदा केविन पीटरसननं भारताचं कौतुक करताना भारत सर्वात अद्भुत देश असल्याचं ट्वीट केलं आहे. असं करताना केविन पीटरसननं या ट्वीटमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील टॅग केलं असून त्यासोबत एएनआयनं दिलेल्या एका बातमीचं ट्वीट त्यानं पोस्ट केलं आहे. भारतानं पुन्हा एकदा काळजी करण्याची आपली वृत्ती दाखवून दिली असल्याचं पीटरसन म्हणाला आहे.

नेमकं कारण काय?

दक्षिण अफ्रिकेमध्ये करोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे रुग्ण आढळल्यापासून जगभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. हा विषाणू डेल्टापेक्षाही अधिक घातक असल्याचं सांगितलं जात आहे. दक्षिण अफ्रिकेमध्ये आधीच मूलभूत सोयीसुविधा आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असताना अशा ठिकाणी करोनाचा नवा विषाणू आढळणं ही त्या त्या राष्ट्रांसाठी मोठी चिंता वाढवणारी बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर भारतानं अफ्रिकेतील ओमायक्रॉन विषाणूने ग्रस्त झालेल्या देशांना मदत देऊ केली आहे. यामध्ये भारतात तयार करण्यात येणाऱ्या करोना लसीचे डोस, पीपीई किट, मास्क अशी सर्व मदत भारताकडून करण्यात येणार आहे.

अफ्रिकेमध्ये ओमायक्रॉनचं संकट घिरट्या घालत असताना भारतानं देऊ केलेल्या मदतीमुळे जागतिक पातळीवर भारताचं कौतुक केलं जात आहे. केविन पीटरसननं देखील ट्विटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “भारतानं पुन्हा एकदा इतरांची काळजी करण्याची वृत्ती दाखवून दिली आहे. भारत हा जगातला सर्वात भारी देश आहे. या देशात खूप सारी चांगल्या ह्रदयाची माणसं आहेत. थँक यू”, असं या ट्वीटमध्ये केविन म्हणाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ट्वीटमध्ये शेवटी केविन पीटरसननं पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील टॅग केलं आहे.