मुंबई : उद्यम सुशासनाचे (कॉर्पोरेट गव्र्हनन्स) देशाच्या विकासात महत्त्वाचे स्थान व वाटा असून कंपनी सेक्रेटरींनी त्यात आणखी महत्वाचे योगदान द्यावे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी मुंबईत केले.
इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (आयसीएसआय)च्या राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमास अमित शहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भारताचे माजी सरन्यायाधीश पी. सथाशिवम यांच्याबरोबरच दीपक पारेख, उद्योग, बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
डॉक्टर जशी रुग्णाची काळजी घेतात, तशी उद्योगाच्या सुशासनाची काळजी कंपनी सेक्रेटरींनी घेतली पाहिजे. उद्यम सुशासनात सीएसनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा, असे आवाहन शहा यांनी केले.
यावेळी अपोलो रुग्णालयाचे संस्थापक डॉ. प्रताप रेड्डी यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. एचडीएफसी जीवनविमा, सिंजेन इंटरनँशनल, ईपीसी लि., महिन्द्रा, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सला संस्थेचे उद्यम सुशासनासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार शहा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आयटीसी, हँवेल इंडिया, मिंडा कॉर्पोरेट यांना सामाजिक उत्तरदायित्वातील कार्यासाठी गौरविण्यात आले.