BJP Leader Dilip Ghosh Remark: वक्फ (सुधारणा) विधेयक संसदेत मंजूर झाल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे हिंसाचार उसळला. या हिंसाचारावर बोलत असताना पश्चिम बंगालमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष यांनी हिंदूंना शस्त्र बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या विधानावर आता विरोधक जोरदार टीका करत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने त्यांचे हे विधान प्रक्षोभक असल्याचे म्हटले. घोष यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील एका जाहीर सभेत बोलत असताना दिलीप घोष यांनी हिंदूंना चिथावणी देणारे विधान केले.

“हिंदू टीव्ही, फ्रिज आणि नवीन फर्निचर खरेदी करत आहेत. पण त्यांच्या घरात एकही शस्त्र नाही. जेव्हा काही वेगळे घडते तेव्हा तुम्ही पोलिसांना फोन करत राहता. पण पोलीस तुम्हाला वाचवायला येणार नाही”, असे विधान भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केले.

देवही कमकुवतांच्या बाजूने नसतो

घोष पुढे म्हणाले, “दहा वर्षांपूर्वी कुणालाही रामनवमीची मिरवणूक म्हणजे काय हे माहीत नव्हते. आज प्रत्येक परिसरात अशा मिरवणुका काढल्या जात आहेत. कारण हिंदूंना कळून चुकले आहे की, आता त्यांना एकत्र येण्याची गरज आहे. कारण देवही कमकुवतांच्या बाजूने नसतो.”

दरम्यान दिलीप घोष यांच्या विधानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असला तरी त्याची खात्री पटविण्यात आलेली नाही. मात्र त्यांच्या विधानावर तृणमूल काँग्रेसने टीका केली आहे. मुर्शिदाबादचे आमदार हुमायूँ कबीर यांनी घोष यांच्यावर जातीय तेढ निर्माण करण्याचा आरोप केला.

भाजपा नेते हिंदूंना भडकवण्यासाठी आणि पश्चिम बंगालमधील संस्कृती बिघडविण्यासाठी धर्माचा वापर करत आहेत, अशी टीका कबीर यांनी केली.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच दिलीप घोष यांनी एका कार्यक्रमात महिलेला धमकी दिल्याचेही प्रकरण समोर आले होते. त्यांची यापूर्वीही काही वादग्रस्त विधाने चर्चेत होती. दिलीप घोष हे त्यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी होते. यावेळी तेथील काही महिलांनी आमच्या भागात काहीही विकासकामे होत नसल्याचा सवाल केला. तसेच खासदार असताना तुम्ही एकदाही या भागात फिरकला देखील नाहीत असा जाब विचारला. यावेळी घोष यांनी सदर महिलांना “ओरडू नकोस, नाहीतर मी तुझा गळा दाबून टाकीन”, असे विधान करत धमकी दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर दिलीप घोष यांनी माध्यमांशी संवाद साधताना दावा केला की, आंदोलक हे तृणमूल काँग्रेसचे समर्थक होते. त्यांनी हा निषेध केलेला नाही तर हे ५०० रुपयांसाठी भुंकणारे संधीसाधू आहेत, ते भुंकतात. दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी दिलीप घोष यांच्या या कृतीचा निषेध केला आणि रस्त्याचे काम पालिकेने केल्याचे पुन्हा सांगितले.