Ex Bangladesh PM Sheikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने बांगलादेशी माध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने (International Crime Tribunal) एका अवमान प्रकरणात शेख हसीना यांना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. बांगगलादेशमधील क्राइम ट्रिब्युनलचे न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तुझा मोझुमदार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे.
गैबांधामधील गोविंदगंजच्या रहिवासी शकील अकंद बुलबुल यांना देखील याच प्रकरणात दोन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बुलबुल या आवामी लीगच्या विद्यार्थी शाखेशी म्हणजेच बांगलादेश छात्र लीगशी संबंधित आहेत. हा अवमान खटला शकील अकंद बुलबुल यांच्याशी झालेल्या कथित फॉनकॉलशी संबंधित आहे. या कथित कॉलमध्ये शेख हसीना नावाची व्यक्ती म्हणत होती की “माझ्याविरोधात २२७ खटले चालू आहे. त्यामुळे मला २२७ जणांना ठार मारण्याचा परवाना मिळाला आहे.”
“हा आंदोलकांना धमकावण्याचा प्रकार”, सरकारी वकिलांचा युक्तिवाद
याप्रकरणी सरकारी वकिलांनी ट्रिब्युनलसमोर असा युक्तिवाद केला की “हे वक्तव्य न्यायालयाचा अवमान करणारं आहे. कारण, अशा वक्तव्यांमुळे न्यायालयीन प्रक्रियेला धोका निर्माण झाला होता. हा देशातील मोठ्या उठावाशी संबंधित चालू असलेल्या खटल्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांना, आंदोलकांना धमकावण्याचा प्रकार होता. हा न्यायालयाचा अवमान आहे. या ऑडिओ क्लिपमुळे न्यायालयीन प्रक्रियेला धोका निर्माण झाला होता. हा देशातील उठावाशी संबंधित खटल्यांमध्ये सहभागी लोकांना धमकावण्याचा प्रकार होता.”
बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना या गेल्या वर्षी देश सोडून पळून गेल्या आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. बांगलादेश सोडल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्यावर अशा प्रकारे न्यायालयीन कारवाई झाली आहे. पहिल्यांदाच एखाद्या प्रकरणात न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे.
बांगलादेशमध्ये गेल्या वर्षी देशव्यापी निदर्शने झाली. या आंदोलनाने पुढे हिंसक वळण घेतलं. हसीना सरकारने हे आंदोलन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यात त्यांना यश आलं नाही. अखेर, ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना बांगलादेश सोडून फरार झाल्या. परिणामी तिथलं आवामी लीगचं सरकार कोसळलं. शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतल्याचं काही दिवसांनी समोर आलं.