रविवारी झालेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच तमाम भारतीयांचा स्वप्नभंग झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही स्टेडियममध्ये उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला विश्वचषक देण्यात आला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली, त्यांची समजूत काढली. या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकीकडे मोदींच्या या कृतीचं सत्ताधारी पक्षांकडून समर्थन केलं जात असताना दुसरीकडे विरोधकांकडून त्यावर टीका केली जात आहे. १९८३ च्या विश्वचषक विजेत्या संघातील माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी या प्रकारावरून मोदींवर परखड शब्दांत टीका केली आहे.

नेमकं काय घडलं?

पराभवानंतर भारतीय संघाच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सामन्यानंतर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्व खेळाडूंची भेट घेतली. कर्णधार रोहित शर्मा विराट कोहली यांचे हात हातात घेऊन पंतप्रधानांनी त्यांच्याशी संवाद साधल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. रवींद्र जडेजासह इतर खेळाडूंशी मोदींनी हस्तांदोलन करत “तुम्ही चांगले खेळलात”, असं सांगितलं. मोहम्मद शमीची गळाभेट घेत त्याच्याशी संवाद साधला. तसेच, भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याच्याशीही मोदींनी यावेळी संवाद साधला.

विरोधकांचा हल्लाबोल

दरम्यान, मोदींच्या या कृतीवर विरोधकांकडून हल्लाबोल करण्यात आला आहे. “त्या व्हिडीओमध्ये भारतीय क्रिकेटपटू अस्वस्थ वाटत आहेत. नुकताच त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट रेकॉर्ड करणारे कॅमेरे ड्रेसिंग रूममध्ये त्यांच्यावर रोखले गेले”, अशी पोस्ट ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एक्सवर (ट्विटर) केली आहे.

IND vs AUS: भारतात झालेल्या विश्वचषकाने रचला इतिहास!आयसीसीची सर्वाधिक पाहिली जाणारी ठरली स्पर्धा, २०१५चा मोडला विक्रम

किर्ती आझाद संतापले!

दरम्यान, १९८३ साली भारताता विश्वचषक जिंकवून देणाऱ्या संघाचे एक सदस्य असणारे माजी क्रिकेटपटू किर्ती आझाद यांनी मोदींच्या या संवादावर संतप्त प्रतिक्रिया सोशल पोस्टच्या माध्यमातून दिली आहे. “ड्रेसिंग रूम ही कोणत्याही संघासाठी एखाद्या गाभाऱ्यासारखी असते. खुद्द आयसीसीही त्या ठिकाणी खेळाडू व सपोर्ट स्टाफशिवाय इतर कुणालाही प्रवेश करू देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ड्रेसिंग रूमच्या बाहेर खासगी भेटकक्षात खेळाडूंची भेट घ्यायला हवी होती. हे मी एक राजकारणी म्हणून नव्हे, तर खेळाडू म्हणून सांगतोय”, असं किर्ती आझाद आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या बेडरूममध्ये, ड्रेसिंग रूममध्ये किंवा बाथरूममध्ये त्यांच्या समर्थकांना अभिनंदन करण्यासाठी किंवा सांत्वन करण्यासाठी येण्याची परवानगी देतील का? खेळाडू हे राजकीय नेत्यांपेक्षा अनेक पटींनी जास्त शिस्तप्रिय असतात”, असंही किर्ती आझाद यांनी या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सांगा कोण करतंय राजकारण?”

दरम्यान, या मुद्द्यावरून विरोधक राजकारण करत असल्याची टीका केली जात असताना किर्ती आझाद यांनी उलट प्रश्न केला आहे. “महत्त्वाचं म्हणजे १९८३ साली भारताला विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघ व या संघाचा कर्णधार कपिल देव यांना अंतिम सामन्यासाठी आमंत्रणच देण्यात आलं नव्हतं. आता मला सांगा कोण राजकारण करतंय?” असा प्रश्न किर्ती आझाद यांनी पोस्टमध्ये उपस्थित केला आहे.