पीटीआय, श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सोमवारी आपल्या मोहिमांचा नवा अध्याय सुरू करत नवीन वर्षांचे उत्साहात स्वागत केले. ‘इस्रो’ने पहिल्या ‘एक्स-रे पोलरिमीटर उपग्रहा’चे (एक्सपोसॅट) यशस्वी प्रक्षेपण केले. या उपग्रहाद्वारे कृष्णविवरांचा अभ्यास करून त्यामागचे रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या मोहिमेद्वारे अशा खगोलीय घटकांचा अभ्यास करणारा भारत हा अमेरिकेनंतरचा दुसराच देश ठरणार आहे.

चेन्नईपासून सुमारे १३५ किलोमीटरवरील अवकाश केंद्रातून ‘पीएसएलव्ही’चे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अवकाश केंद्रातून प्रक्षेपण झाले. प्रक्षेपणासाठीची २५ तासांची उलटगणती संपल्यानंतर, ४४.४ मीटर लांबीचा प्रक्षेपकाने उड्डाण केले. ही घटना पाहण्यासाठी मोठय़ा संख्येने आलेल्या नागरिकांनी यावेळी जल्लोष करत टाळय़ांचा कडकडाट केला. ‘इस्रो’ने एप्रिल २०२३ मध्ये ‘पीओएएम-२’चा वापर करून असाच एक वैज्ञानिक प्रयोग केला होता.

या मोहिमेत ‘इस्रो’च्या अतिशय भरवशाचा ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाने (पीएसएलव्ही) -‘सी ५८’ आपल्या साठाव्या मोहिमेत प्रमुख अभ्यास उपग्रह ‘एक्सपोसॅट’सह अन्य अवकाशीय अभ्यासाची उपकरणे (पेलोड) अवकाशात प्रक्षेपित केली. एका उपकरणाची निर्मिती महिलांनी केली आहे.

हेही वाचा >>>भूमाफियांचा प्रताप; रात्रीच्या अंधारात चोरी केला अख्खा तलाव, झोपडी बांधून तयार केले मैदान

प्रक्षेपकाने प्रमुख उपग्रह ‘एक्सपोसॅट’ ६५० किलोमीटरवरील पृथ्वीच्या निम्न कक्षेत प्रस्थापित केले. नंतर शास्त्रज्ञांनी ‘पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपरिमेंटल मॉडय़ूल’सह (पीओएएम) प्रयोग करण्यासाठी उपग्रहाची कक्षा ३५० किलोमीटपर्यंत घटवली. या बिंदूपासून ‘पीएसएलव्ही’च्या चौथ्या टप्प्याची कक्षा निम्न कक्षेत बदलेल. जिथे ‘पीओएएम’ नावाचा ‘पीएसएलव्ही’चा वरचा टप्पा ‘पेलोड’सह प्रयोग करेल आणि त्यासाठी काही वेळ लागेल. ‘एक्सपोसॅट’ खगोलीय क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यात आणि कृष्णविवरांच्या रहस्यमय बाबींचा अभ्यास करण्यात मदत करेल. असा अभ्यास करणारा इस्रोचा हा पहिलाच समर्पित वैज्ञानिक उपग्रह आहे.

नवीन वर्ष गगनयानच्या तयारीचे वर्ष

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश): इस्रो आपली महत्त्वाकांक्षी मानवी अवकाश मोहीम ‘गगनयान’साठी या वर्षी चाचण्यांची मालिका घेणार आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष ‘गगनयान’च्या तयारीचे वर्ष असेल. ‘एक्सपोसॅट’ नियोजित कक्षेत यशस्वीरित्या प्रस्थापित केल्यानंतर ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ही माहिती दिली.

मोहिमेची वैशिष्टय़े

’  मोहिमेचा कालावधी पाच वर्षांचा

’  कृष्णविवरांसारख्या (ब्लॅक होल) खगोलीय निर्मितीमागील रहस्य उकलण्याचा प्रयत्न

’   क्ष-किरण ध्रुवीकरणात किरणोत्सर्जन आणि खगोलीय स्त्रोतांच्या भौमितिक तपासणीसाठी एक महत्त्वाचे अभ्यास साधन

’  ‘एक्सपोसॅट’चा जगभरातील खगोलशास्त्रज्ञांना अभ्यासासाठी मोठा लाभ

’   एका उपग्रहाची संपूर्ण निर्मिती महिलांकडून

हेही वाचा >>>जपानमध्ये किनारपट्टीच्या भागात डझनभरहून अधिक भूकंपाचे धक्के, घरांचं नुकसान, रस्त्यांना भेगा अन्…

या मोहिमेने अवकाश क्षेत्रातील भारताचे कौशल्य वृद्धिंगत होणार आहे. २०२४ वर्षांची ही चांगली सुरुवात झाली आहे. आमच्या शास्त्रज्ञांचे आभार! अवकाश क्षेत्रासाठी हे प्रक्षेपण विस्मयजनक आहे. यामुळे भारताची क्षमता आणखी वाढली आहे. भारताला या क्षेत्रात अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी ‘इ्स्रो’चे आभार आणि आपल्या शास्त्रज्ञांना आणि संपूर्ण अवकाश संशोधन क्षेत्राला खूप शुभेच्छा. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हा उपग्रह ज्या कक्षेत स्थिर केला आहे ती एक उत्कृष्ट कक्षा आहे. नियोजित कक्षा ६५० किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेपासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि ००१ अंश कोनात हा उपग्रह झुकला आहे. ही अतिशय उत्कृष्ट परिभ्रमण स्थितींपैकी एक आहे. तसेच उपग्रहाचे ‘सौर पॅनेल’ यशस्वीरित्या कार्यान्वित झाले आहेत.- एस सोमनाथ, अध्यक्ष, ‘इस्रो

ही मोहीम आणखी वैशिष्टय़पूर्ण बनवणारे नवीन तंत्रज्ञान म्हणजे ‘पीओएएम- ३’ चा प्रयोग यात करण्यात आला आहे. सिलिकॉन-आधारित उच्चस्तरीय ऊर्जा स्रोताची विजेरी, रेडिओ उपग्रह सेवेचा यात अंतर्भाव आहे.जयकुमार एम, संचालक, एक्सपोसॅट मोहीम

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Exposat was successfully launched by the indian space research organization amy
First published on: 02-01-2024 at 04:43 IST