भारतात गैरमाहितीला आळा घालण्याची फेसबुकची तयारी!

दी इंडियन एक्स्प्रेसने अमेरिकेतील दी न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तावर काही प्रश्न फेसबुककडे उपस्थित केले होते.

नवी दिल्ली : केरळमधील  एका फेसबुक संशोधकाने तयार केलेल्या खात्यावर त्याला दोन वर्षांपूर्वी अनेक द्वेषमूलक संदेश व गैरमाहितीचा सामना आज्ञावली आधारित अलगॉरिदमिक शिफारशींमुळे करावा लागला होता. त्यामुळे आता फेसबुकला त्यांच्या भारतातील शिफारस प्रणालीचा सखोल व गंभीर विचार करावा लागणार आहे.

फेसबुकनेच या घटनेची माहिती दिली असून सुधारणा करण्याचा संकेत दिला आहे.

दी इंडियन एक्स्प्रेसने अमेरिकेतील दी न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तावर काही प्रश्न फेसबुककडे उपस्थित केले होते. त्यात समाजमाध्यमांचा भारतात होणारा परिणाम, विशेष करून २०१९ मधील लोकसभा निवडणुकांशी संबंधित व नंतरच्या काळातील परिणामांचा उल्लेख केला होता. फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे, की एक चाचणी खाते या फेसबुक संशोधकाने सुरू केले होते, त्यात ज्या शिफारशी फेसबुककडून करण्यात आल्या त्यात व्देषमूलक भाषेतील आशयाचा समावेश होता. आता त्याची दखल घेऊन फेसबुक त्यांच्या शिफारस यंत्रणेत काही बदल करणार असून काही राजकीय गट, नागरी गट तसेच द्वेषमूलक या गटात मोडणारा आशय शिफारस प्रणालीतून काढून टाकणार आहे. यानंतर फेसबुकमध्ये कठोर छाननी लावून बदल केले जाणार आहेत. द्वेषमूलक आशय काढून टाकण्याचे आमचे प्रयत्न नेहमीच चालू राहणार आहेत. त्यामुळे अजून चार भारतीय भाषात असे आशय वर्गीकरण करण्याची सोय करण्यात आली आहे असे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

दी न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या बातमीत असे म्हटले होते, की आतापर्यंत फेसबुक संशोधकांनी अनेक प्रकारची माहिती व त्याबाबतचे अहवाल सादर केले असून त्यात भारतात फेसबुकच्या आशयाचे जे परिणाम होत आहेत त्यांचा विचार करण्यात आला आहे. फेसबुकची काही अंतर्गत कागदपत्रे ही कन्सोर्टियम ऑफ न्यूज ऑर्गनायझेशन या संस्थेला मिळाली असून त्यात दी न्यूयॉर्क टाइम्सचा समावेश होता. दी फेसबुक पेपर्समध्ये बरीच माहिती असून त्यात फेसबुकच्या आशयाचे जे परिणाम होतात त्याचे अंतर्गत विश्लेषण करण्यात आले आहे.

चुकीची माहिती पसरवणाऱ्यांना अटकाव

फेसबुकचे माजी उत्पादन व्यवस्थापक फ्रान्सेस हॉगेन यांनी यात जागल्याची भूमिका पार पाडताना फेसबुकबाबतची माहिती सेनेटच्या उप समितीला सुनावणीवेळी दिली होती. हॉगेन यांनी सादर केलेल्या कागदपत्रात भारताविषयीच्या कागदपत्रांचा समावेश होता. या महिन्यातच या तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. आता फेसबुकने आशयाबाबतच्या शिफारशी करताना कठोर धोरण ठेवले असून आरोग्य गटांना यातून वगळण्याचे ठरवले आहे. तसेच, जे गट चुकीची माहिती पसरवतात त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात येत आहे. जे गट चुकीची माहिती पसरवतात त्यांना न्यूजफीडमध्ये खालच्या श्रेणीत  ठेवले जाणार असून त्यांच्या पोस्टस म्हणजे मजकूर जे लोक बघतील त्यांची संख्या कमी राहील असाच प्रयत्न केला जाईल.

अल्पसंख्य समाजाविरोधातील संदेश

कोविड काळातही फेसबुकचा बराच गैरवापर झाला असून त्या अनुषंगानेही बदल करण्यात येत आहेत. कोविड काळात मुस्लीम समाजाला लक्ष्य करण्यात आले होते. त्याबाबतचे हॅशटॅग आम्ही बंद केले होते असा दावा फेसबुकने केला आहे.

धर्म व वंश यांचा संबंध विषाणूच्या प्रसाराशी जोडणारा काही आशय होता. काही विशिष्ट समाजाच्या लोकांमुळे विषाणू पसरल्याचे त्यात म्हटले होते, त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Facebook ready to curb misinformation in india zws

ताज्या बातम्या