महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या जाहिरातीचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत होता. खरंतर, ‘दैनिक जागरण’ वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीवरून हा वाद निर्माण झाला होता. व्हायरल फोटोचा हवाला देत, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त दिलेल्या जाहिरातीत अरविंद केजरीवालांचा खूप मोठा तर एका कोपऱ्यात महात्मा गांधींचा अगदी छोटासा फोटो छापण्यात आल्याचा दावा करत मोठी टीका होऊ लागली होती. मात्र, आता ‘दैनिक जागरण’च्याच फॅक्ट चेकमधून या जाहिरातीच्या व्हायरल फोटोमागचं सत्य समोर आलं आहे.
‘दैनिक जागरण’ वर्तमानपत्रात छापलेला मूळ फोटो पाहिल्यावर हे स्पष्ट झालं आहे की, व्हायरल होणारा फोटो एडिट केला आहे म्हणजेच बनावट आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये महात्मा गांधींऐवजी अरविंद केजरीवाल यांचा फोटो एडिट करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील या व्हायरल झालेल्या फोटोशी संबंधित एक पोस्ट करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये व्हायरल फोटोचं खंडन करताना असं लिहिलं आहे की, “हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा मॉर्फ्ड फोटो आहे. जो चुकीच्या हेतूने शेअर केला जात आहे.”

व्हायरल मॉर्फ्ड फोटोमध्ये नेमकं काय होतं?
संबंधित जाहिरातीच्या व्हायरल मॉर्फ्ड फोटोमध्ये नेमकं काय होतं? जाणून घेऊया. तर, या व्हायरल फोटोमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या मोठ्या फोटोसह महात्मा गांधी यांचा एक विचार छापण्यात आला होता. “तुम्हाला जगात जो बदल पाहायचा आहे तो सर्वप्रथम स्वतः आणा – महात्मा गांधी”, असं केजरीवाल यांच्या या फोटोसह छापण्यात आल्याचं दिसून आलं होता. तर फोटोच्या खाली लिहिलं होतं, “गांधी जयंती, २ ऑक्टोबर. चला, आज गांधी जयंतीच्यानिमित्त्ताने आपण गांधीजींनी घालून दिलेल्या तत्त्वांचं पालन करण्याची प्रतिज्ञा घेऊया. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवाद.”
काँग्रेस नेते जितू पटवारी यांनी हा व्हायरल मॉर्फ्ड फोटो शेअर करताना अरविंद केजरीवाल यांना जोरदार टोला लगावला होता. जितू पटवारी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले होते की, “तुमच्यामध्ये बदल आणा, गांधीजींना लहान करा. स्वतःला मोठं करा. वाह अरविंद केजरीवाल जी वाह.”