Dr John Camm Madhya Pradesh Scam: मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी उघड झाली होती. युकेमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जॉन कॅम असल्याचे भासवून नरेंद्र विक्रमादित्य यादव नामक तोतयाने दामोह जिल्ह्यातील मिशन रुग्णालयात काही रुग्णांची हाताळणी केली. यादवने जे शेवटचे पाच रुग्ण हाताळले होते, त्या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती मध्य प्रदेश विधानसभेत देण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
मध्य प्रदेश विधानसभेत सादर केलेल्या माहितीनुसार, नरेंद्र यादव याने आपली ओळख लपवून काही रुग्णांची अँजिओप्लास्टी केली होती. २ जामेवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान दामोह जिल्ह्यातील मिशन रुग्णालयात त्याने १२ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यापैकी पाच रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दोन रुग्णांवर उपचार सुरू असताना आणि तीन रुग्णांवर उपचार केल्यानंतर मृत्यू झाला, असे द इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे.
विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, यादवकडून अँजिओप्लास्टी केलेले शेवटचे पाच रुग्ण हे ५१ ते ७५ वयोगटातील होते. हे सर्व एका महिन्याच्या कालावधीत एकामागून एक मरण पावले. यामुळे आता यादवची पार्श्वभूमी किंवा त्याची खरी माहिती पडताळता त्याला कामावर कसे ठेवण्यात आले, याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
यादवच्या १२ शस्त्रक्रियांपैकी पहिली शस्त्रक्रिया यावर्षी २ जानेवारी रोजी तर शेवटची शस्त्रक्रिया ११ फेब्रुवारी रोजी झाली. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि रुग्णालयातून बाहेर पडले.
मृत्युमुखी पडलेले रुग्ण कोण? आणि उपचार घेतल्याची तारीख
- रहीसा बेगम (वय ६३) – १५ जानेवारी
- इस्रायल खान (वय ७५) – १७ जानेवारी
- बुद्ध अहिरवार (वय ६७) – २५ जानेवारी
- मंगल सिंह राजपूत (वय ६५) – २ फेब्रुवारी
- सत्येंद्र सिंह राठोड (वय ५१) – ११ फेब्रुवारी
मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी माहिती देताना मान्य केले की, मध्य प्रदेश नर्सिंग होम्स अँड क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट्स (नोंदणी आणि परवाना) कायद्यानुसार नरेंद्र यादव यांच्या नियुक्तीची माहिती रुग्णालयाने आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेली नव्हती.
रुग्णालयाने संबंधित यंत्रणेला यादव यांच्या नियुक्तीची माहिती न दिल्यामुळे त्यांनी रुग्णांवर उपचार सुरू करण्यापूर्वी सरकारला त्यांच्या वैद्यकीय पात्रता आणि प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची कोणतीही संधी नव्हती. यादव यांना एप्रिलमध्ये अटक करण्यात आलेली आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.