दिल्लीत एका अल्पवयीन मुलीची हत्या तिच्या मित्राने चाकूचे २० वार करत आणि दगडाने ठेचत केली. ही बातमी ताजी असतानाच आता सूरतमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. वडिलांनी आपल्या मुलीच्या पोटात चाकूचे २५ वार करत तिला ठार केलं. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत मुलीची आईही जखमी झाली आहे. सूरतमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

नेमकी काय घडली घटना?

“रामानुज नावाचा एक माणूस सूरतच्या कडोदरा भागातील सत्य नगर सोसायटीत राहतो. १८ मे २०२३ या दिवशी त्याने आपल्या मुलीची चाकूचे वार करुन हत्या केली. रामानुजच्या त्याच्या पत्नीशी गच्चीवरुन झोपवण्यावरुन वाद झाला होता. त्यानंतर मुलीच्या पोटात २५ वार करुन रामानुजने तिची हत्या केली. मुलीवर हल्ला झाल्यावर मुलीची आईही मधे पडली तेव्हा रामानुजने तिच्यावरही हल्ला केला. या मुलीच्या आईला त्याने मारण्याचा प्रयत्न केला. रामानुजने गच्चीवर झोपण्याच्या वादातून मुलीची हत्या केली आहे. या घटनेमुळे सूरत हादरलं आहे.

रामानुजला पोलिसांनी केली अटक

मुलीची हत्या आणि पत्नीच्या हत्येचा प्रयत्न या गुन्ह्यांखाली पोलिसांनी रामानुजला अटक केली आहे. ज्या चाकूने रामानुजने मुलीची हत्या केली आणि कुटुंबावर हल्ला केला तो चाकूही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक आर. एस. पटेल यांनी सांगितलं की ११ मे २०२३ या दिवशी रात्री ११ च्या दरम्यान सत्य नगर सोसासयटीत भाडे तत्त्वार राहणाऱ्या रामानुजचं त्याच्या पत्नीशी गच्चीवर झोपण्यावरुन भांडण झालं. त्याने आधी मुलीच्या आईवर हल्ला केला. त्यानंतर मुलगी मधे पडली तेव्हा तिच्यावर चाकूचे २५ वार करत तिला ठार केलं. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला. मुलीची हत्या केल्यानंतर रामानुज हा त्याच्या पत्नीच्या मागेही चाकू घेऊन धावला होता. त्याच्या पत्नीच्या हातावर, डोक्यावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत अशीही माहिती पोलिसांनी दिली. पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर रामानुजला अटक करण्यात आली आहे. पोलीस आता पुढील कारवाई करत आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.