‘उडता पंजाब’ चित्रपटातून पंजाब म्हणजे अमली पदार्थांची राजधानी एवढेच दाखवण्यात आले आहे, असे तुम्हाला सूचवायचे आहे का, असा प्रश्न गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने चित्रपट परिनिरीक्षण मंडळाला (सीबीएफसी) विचारला. उडता पंजाब चित्रपटामध्ये मंडळाकडून सुचविण्यात आलेल्या कट्सच्या विरोधात चित्रपटकर्त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याचिकाकर्ते आणि परिनिरीक्षण मंडळ या दोघांनाही प्रश्न विचारले.
परिनिरीक्षण मंडळाने या चित्रपटातील काही शब्दही वगळण्यास सांगितले आहे. त्यावरून न्यायालयाने तुम्ही चित्रपटकर्त्यांना खासदार, आमदार, निवडणूक असे शब्द का वगळायला सांगता आहात, असाही प्रश्न उपस्थित केला. त्यामागे काय कारण आहे, असे न्यायालयाने मंडळाला विचारले. त्याचबरोबर चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने सुचविलेल्या १३ सुधारणा या वाईटच आहेत, असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न चित्रपटकर्त्यांना विचारण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने शुक्रवारपर्यंत स्थगित केली आहे.
चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी आणि बॉलिवूड यांच्यामध्ये या चित्रपटावरून वाद निर्माण झाला असून, निहलानींच्या हकालपट्टीची मागणी बॉलिवूडमधील निर्मात्यांनी केली आहे. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत चित्रपटामध्ये अशा पद्धतीने सुधारणा सुचविण्याचा विरोध केला आहे.
Film #UdtaPunjab controversy: Are you suggesting that the movie depicts Punjab as only a drug capital?, Bombay HC to CBFC
— ANI (@ANI_news) June 9, 2016
Film #UdtaPunjab controversy: How can you ask them to delete words like MP, MLA, Election?, says Bombay HC to CBFC
— ANI (@ANI_news) June 9, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.