नोटाबंदीनंतर सध्या चलनात असलेल्या २ हजारांच्या नोटांवर बंदी आणण्याचा कोणताही विचार नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिली आहे. मागील वर्षी ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला आणि ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. काळा पैसा रोखण्यासाठी, भ्रष्टाचार थांबविण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोदी सरकारने वारंवार जाहीर केले आहे. यानंतर एक चर्चा अशीही रंगली होती की, नोटाबंदीच्या निर्णयाला विशेष कालावधी झाल्यावर २ हजार रूपयांची नोट बंद केली जाणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५०० आणि २ हजार रूपयांच्या नोटा केंद्र सरकारने चलनात आणल्या. आता २०० रूपयांची नोटही लवकरच चलनात येणार आहे. याचप्रमाणे २० आणि ५० रूपयांच्याही नव्या नोटा चलनात येणार आहेत. अशात २ हजार रूपयांची नोट बंद होते की काय? अशी शक्यता काही तज्ज्ञांकडून वर्तवली जात होती. मात्र केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी दिलेल्या माहितीमुळे ही नोट बंद होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. २०० रूपयांची नोट चलनात कधी आणली जाईल याचा निर्णय आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया घेईल असेही केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी जाहीर केले आहे. नोटांची छपाई कधी केली जाईल याचाही निर्णय आरबीआय घेईल असंही जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. २०, ५०, २०० आणि ५०० रूपयांच्या नोटा चलनात आल्यावर हळूहळू २ हजार रूपयांची नोट चलनातून बाद होईल अशी एक चर्चा आर्थिक वर्तुळात रंगल्याबाबत जेटली यांना प्रश्न विचारला होता, ज्यावर सरकार असा कोणताही विचार करत नसल्याचं जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे दहशतवाद्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे त्याचमुळे हा निर्णय योग्य ठरला आहे असं वक्तव्य अरूण जेटली यांनी काही दिवसांपूर्वीच केलं होतं. नोटाबंदीचा निर्णय झाल्यावर सामान्य माणसाला नोटा बदलण्यासाठी त्रास झाला होता, मात्र या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेला गती येईल असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केला होता. नोटाबंदीच्या निर्णयानंतर २ हजारांची नोट बंद होणार का? अशीही एक चर्चा रंगली होती मात्र ही चर्चा आता संपल्यात जमा आहे.