गेल्या महिन्याभरापासून पूर्वेकडील आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांमधला तणाव पराकोटीचा वाढला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून या दोन राज्यांमध्ये सुरू असलेला वाद आता हिंसक स्वरूप घेऊ लागला आहे. काही दिवसांपूर्वीच या दोन्ही राज्यांच्या सीमवर झालेल्या गोळीबारात ५ आसाम पोलिसांचा मृत्यू झाला असून एक पोलीस अधिकारी देखील जखमी झाले आहेत. यानंतर दोन्ही राज्यांमधले संबंध पराकोटीचे ताणले गेले आहेत. त्या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असताना आता हे प्रकरण त्याही पुढे गेलं आहे. एकीकडे आसाम पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या मिझोराम पोलिसांच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली असताना मिझोराम पोलिसांनी थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधातच गुन्हा दाखल केला आहे!

आसामनं पाठवल्या नोटिसा…

आसाम आणि मिझोरामच्या सीमारेषा लागून असलेल्या कचर भागामध्ये काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला. यामध्ये ५ मिझोराम पोलिसांचा मृत्यू झाला असून पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर हे जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद अजूनही शमण्याचं नाव घेत नाहीये. या प्रकरणात शुक्रवारी आसाम प्रशासनाने मिझोरामच्या संबंधित कोलासिब जिल्हा प्रशासनातील ६ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नोटीस पाठवली. त्याशिवाय, मिझोरामचे राज्यसभेतील एकमेव खासदार के. वनलेवना यांना देखील नोटीस पाठवण्यात आली आहे.

मिझोरामनं थेट मुख्यमंत्र्यांविरोधातच दाखल केला गुन्हा!

एकीकडे आसामनं शुक्रवारी मिझोराममधील पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली, तर दुसरीकडे मिझोरामनं चक्क आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांच्याविरुद्ध गुन्हाच दाखल केल्याचं जाहीर केलं. ज्या दिवशी गोळीबाराची घटना घडली, म्हणजेच २६ जुलै रोजीच आसामचे मुख्यमंत्री आणि इतर ६ अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिझोराम प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामध्ये हिमंता बिस्व सर्मा यांच्यासोबत आयजीपी अनुराग अगरवाल, डीआयडी कचर देवज्योती मुखर्जी, डीसी कचर किर्ती जल्ली, कचरचे डीएफओ सुन्यदेव चौधरी, कचरचे एसपी वैभव निंबाळकर, ढोलाई पोलीस स्थानकाचे ओसी साहब उद्दीन यांची नावं आहेत.

 

सीमाभागातील सामान्यांकडेही शस्त्रास्त्र

दरम्यान, मिझोराम प्रशासनानं सीमेवरील सामान्य नागरिकांनाही शस्त्रास्त्र दिल्याचा दावा आसाममधील कचरच्या उपायुक्त किर्ती जल्ली यांनी केला आहे. “”आमच्या माहितीनुसार, मिझोराम सरकारने सामान्य नागरिकांना देखील शस्त्रास्त्र दिली आहेत. यातले अनेकजण माजी अतिरेकी आहेत. त्यामुळे ते ट्रेन्ड आहेत. ते आक्रमकपणे आमच्या दिशेने येत आहेत. आम्हाला त्यांना कुठे ना कुठे तरी थांबवावं लागेल”, असं त्या म्हणाल्या आहेत.

 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्लीतही वातावरण तापलं

दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलं आहे. कचर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक सिंघल यांनी या मुद्द्यावरून राज्यसभा अध्यक्षांशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं आहे. “बराक खोऱ्यातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आसाम-मिझोराम सीमारेषेवरील वादासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही यासंदर्भात राज्यसभा सभापतींची देखील भेट घेऊन मिझोराममधील राज्यसभा खासदारांनी या प्रकरणात निभावलेल्या भूमिकेविषयी बोलणार आहोत”, असं ते म्हणाले आहेत.