FIR lodged against 7 police personnel Crime News : एका किशोरवयीन मुलगी चार वर्षापूर्वी झालेल्या वडील आणि अल्पवयीन भाऊ यांच्या बनवाट चकमकीच्या विरोधात तीन वर्षांपासून कायदेशीर लढा देत होती. अखेर या लढाईला काहीसं यश मिळाताना पाहायला मिळलं. गुजरातच्या सुरेंद्रनगर येथे झालेल्या या घटनेप्रकरणी एका उपनिरीक्षक आणि इतर सहा पोलीस कर्मचार्यांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मृत हनीफखान जटमालेक यांच्या सासू आणि त्यांची मुलगी सुहानाच्या कायदेशीर पालक हनीफाबेन जटमालेक यांनी गुरुवारी बजाना पोलिस ठाण्यात सात आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला.
बजाना हे तेचे पोलीस स्टेशन आहे जेथे २०२१ मध्ये ही घटना घडली तेव्हा आरोपी पीएसआय विरेंद्रसिंह जाडेजा, हेड काँस्टेबल राजेशभाई मिथापारा आणि किरिट सोलंकी, कॉन्स्टेबल शैलेशभाई काठेवाडीया, दिग्विजय झाला, प्रल्हादभाई चरमाता आणि मनुभाई फतेपापा हे कार्यरत होते.
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (आयपीसी) कलम ३०२ (हत्या) आणि ११४ (गुन्हा घडाताना उपस्थित असलेला) अशा कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहानाने द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “दीर्घकाळच्या कायदेशीर लढाईनंतर आता आम्हाला समाधान आहे की ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट चकमकीत माझे वडील आणि भावाला ठार केले त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला गेला. या पोलीस कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा झाली तरच मला न्याय मिळेल, जेणेकरून हे किंवा इतर कोणताही पोलीस असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.”
२०२२ मध्ये १३ वर्ष वय असलेल्या सुहानाने गुजरात उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आणि आरोपी पोलिसांविरुद्ध कायदेशीर कारवाईची विनंती केली.
गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल आणि न्यायमूर्ती प्रणव त्रिवेदी यांच्या कोरमने २६ जुलै २०२४ रोजी एक आदेश पारित केला. ज्यामध्ये म्हटले की, “याचिकाकर्त्याला फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत संबंधित दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागण्याचे स्वातंत्र्य आहे. या आदेशाची प्रत सोबत जोडून केलेल्या अर्जावर संबंधित दंडाधिकाऱ्यांनी आवश्यक चौकशी करतील आणि काटेकोरपणे कायद्याच्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करतील.”
सुहानाने या वर्षी १७ एप्रिल रोजी सुरेंद्रनगर जिल्हा ध्रुंगध्र पाटडी जेएमएफसी (ज्युडिशीयल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास). न्यायमूर्ती आर आर झिंबा यांनी आदेश जारी केला ज्यामधअये बाजाना पोलीसांनी सात पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गु्न्हा दाखल करावा. “तपास उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने करावा आणि न्यायालयात अहवाल सादर करावा,” असे न्यायालयाने म्हटले होते.
पोलिसांनी मुलाच्या छातीत गोळी घातली..
हनिफबेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२१ रोजी बाजाना पोलिस सब-इन्स्पेक्टर जाडेजा आणि इतर सहा पोलीस खाजगी वाहानाने आणि साध्या कपड्यांमध्ये आमच्या गेडिया गावातील घरी आले. त्यांनी पोलीस कर्मचारी असल्याचे सांगून, हनिफखान याला पकडून कारमध्ये बसवले. यादरम्यान हानिफ यांचा १४ वर्षांचा मुलगा मदीन घराबाहेर आला आणि त्याच्या वडीलांना घेऊन जाण्यापासून (पोलीस साध्या कपड्यात असल्याने) त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू लागला . पीएसआय जडेजा याने खिशातून पिस्तूल काढलं आणि मदीन याच्या छातीत अगदी जवळून गोळी घातली आणि त्याला जागेवरच ठार केलं. हानिफखानने पोलीसांशी झटापट केली, त्याला देखील पीएसआय जाडेजा याने गोळी घालून ठार केले.”
त्या पुढे म्हणाल्या की, “शेजारी गोळा झाल्यानंतर पोलीस घटनास्थळावरून निघून गेले आणि नंतर हनिफखानच्या कुटुंबियांवर हत्येच्या प्रयत्नाची पोलीस तक्रार दाखल केली. त्यामागे एन्काउंटर लपवण्याचा उद्देश होता. या घटनेनंतरही आरोपी पोलीस कर्मचारी आम्हाला धमक्या देत राहिले.”
या प्रकरणाचा तपास करत असलेले सुरेंद्रनगर जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक जे डी पुरोहीत म्हणाले की, “मी तपासाचा चार्ज आज स्वीकारला आहे. मी या प्रकरणातील तक्रारकर्ते आणि साक्षिदारांना फोन करेन आणि त्याचे जबाब नोंदवेन. तसेच मी पीएसआय जडेजा यांनी हानिफखान याच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती देखील तपासेन. सात आरोपी पोलीस कर्मचार्यांना बोलावून त्यांचे जबाब नोंदवले जातील… जर माझ्या तपासात पोलीस दोषी आढळले तर आम्ही त्यांना अटक करू. तपास पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन ते तीन महिने लागतील.”