दिल्लीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यांवर नव्हे, तर मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले, असं विधान दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी केले आहे. तसेच हिंदू-मुस्लीस सौहार्दाचे हे उत्तम उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा – के.कविता यांच्या अडचणीत वाढ, दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीनंतर आता ‘सीबीआय’कडून अटक

दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी गुरुवारी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट करत ईदनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. देशात पहिल्यांदाच ईदनिमित्त रस्त्यांवर नव्हे, तर मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले आहे. हे हिंदू-मुस्लीस सौहार्दाचे हे उत्तम उदाहरण आहे. यावरून अनेक मुद्दे परस्पर चर्चेतून सोडवले जाऊ शकतात, हे सिद्ध होते. मी दिल्लीतील सर्व मशिदी आणि ईदगाहांच्या इमामांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच यावेळी त्यांनी मुस्लीम समाजाचं कौतुकही केलं.

हेही वाचा – ‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?

ते पुढे म्हणाले, की यासंदर्भात ४ एप्रिल रोजी दिल्लीच्या सर्व इमामांबरोबर बैठक घेण्यात आली होती. यावेळी वाहतुकीस अडथळा होऊन सामान्य जनतेला त्रास होऊ नये, यासाठी मशिदीच्या आवारात नमाज पठण करण्याची विनंती त्यांना करण्यात आली होती. या विनंतीला मान देऊन त्यांनी मशिदीच्या आवारात नमाज पठण केले. विशेष म्हणजे यावेळी कोणतीही अनुचित प्रकार घडला नाही.