फ्लिपकार्टने येत्या काही काळामध्ये १ अब्ज डॉलर उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नुकताच त्यांनी १ अब्ज डॉलर उभे केले असून पुढील काही महिन्यांमध्ये तितकीच रक्कम उभी करण्याचा फ्लिपकार्टचा मानस आहे. इ-कॉमर्स क्षेत्रात तग धरुन राहण्यासाठी धडपडणाऱ्या फ्लिपकार्टसाठी ही नवसंजीवनी ठरणार आहे.

गेल्या दोन वर्षांपासून फ्लिपकार्टला उतरती कळा लागली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये फ्लिपकार्टची कंपनीची किंमत १५ अब्ज डॉलर होती. ती घसरुन १० अब्ज डॉलरवर आली आहे. इ-कॉमर्स क्षेत्रामध्ये अॅमेझॉनसारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देण्याचे आव्हान फ्लिपकार्ट समोर आहे. त्यांच्यासमोर तग धरुन राहायचे असेल तर गुंतवणूकदारांची कृपादृष्टी होणे आवश्यक आहे.

तोच विचार घेऊन फ्लिपकार्टने १ अब्ज डॉलर उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत मायक्रोसॉफ्ट कार्पोरेशन, इबे, टॅंसेट सारख्या कंपन्यांनी फ्लिपकार्टमध्ये गुंतवणूक करुन त्यांना तारले आहे. नव्या गुंतवणुकीमुळे फ्लिपकार्टच्या स्थितीत सुधार होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काही महिन्यांपूर्वी कल्याण कृष्णमूर्ती यांना फ्लिपकार्टचे मुख्याधिकारी बनवण्यात आले. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक बिन्नी बंसल यांना समूहाचे मुख्याधिकारी बनविण्यात आले तर सचिन बंसल हे समुहाचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.  गेल्या काही महिन्यांपासून फ्लिपकार्टच्या नफ्यात सातत्याने घट होत होती त्यामुळे गुंतवणूकदार नाराज होते त्यामुळेच फ्लिपकार्टमध्ये मोठी गुंतवणूक असणाऱ्या टायगर ग्लोबल या कंपनीचे अधिकारी कृष्णमूर्ती यांची निवड फ्लिपकार्टचे मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली होती.

मागील वर्षी फ्लिपकार्टने ३०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले होते. जर कामगिरीमध्ये सातत्य नसेल आणि जर तुम्ही उद्दिष्टे गाठली नाहीत तर तुम्हाला केव्हाही घरी जावे लागू शकते असे सचिन बंसल यांनी त्यावेळी म्हटले होते. इतकेच नव्हे तर माझ्या कामगिरीमुळेच मला फ्लिपकार्टचे मुख्याधिकाऱ्याचे पद सोडावे लागले होते असा गौप्यस्फोट त्यांनी या बैठकीदरम्यान केला होता.

बिन्नी बंसल यांची मुख्याधिकारी पदावरुन नियुक्ती होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झाले होते परंतु त्यांची कामगिरी या काळात फारशी समाधानकारक नसल्यामुळे त्यांना पदावरुन बाजूला सरकविण्यात आले होते. कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टमध्ये येण्याआधी टायगर ग्लोबल या कंपनीमध्ये व्यवस्थापकीय संचालक पदावर काम करीत होते.