उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे (सपा) अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची प्रकृती काल (रविवार) बिघडली. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची तब्येत आणखी खालावल्याने त्यांना आयसीयू मधून आता क्रिटिकल केअर यूनिट(सीसीयू)मध्ये हलवण्यात आलं आहे. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवाय, पुढील २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाने मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देण्यासाठी पत्रक जारी केलं आहे. शिवाय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर बारकाईन लक्ष ठेवून आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत अखिलेश यादव यांच्याकडे विचारपूस केली आहे. तसेच, पंतप्रधांन मोदींनी अखिलेश यांना जी काही मदत आवश्यक असेल ती सर्व करू, असेही सांगितले आहे.

याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे.“उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळताच मी त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांना फोन करून विचारपूस केली. ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की ते लवकरात लवकरक बरे व्हावेत.” असं राजनाथ सिंह यांनी ट्वीट द्वार सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथा यांनीही अखिलेश यादव यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधून मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केल्याचेही समोर आले आहे. तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मुलायमसिंह यादव यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.