पेशावर : पाकिस्तानातील अस्थिर खैबर पख्तुनख्वा प्रांतात नवीन पोलीस ठाण्यावर रविवारी दहशतवादी हल्ला झाला. त्यात किमान चार पाकिस्तानी पोलीस ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले.

दक्षिण वझिरीस्तान या आदिवासीबहुल जिल्ह्याच्या सीमेलगतच्या लकी मारवत येथील बरगाई पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हातबॉम्ब आणि ‘रॉकेट लाँचर’सह प्राणघातक शस्त्रांनी हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांशी जोरदार चकमक झाल्यानंतर या हल्लेखोर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून मोठय़ा प्रमाणात शोधमोहीम राबवण्यात येत आहे.खैबर पख्तुनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री महमूद खान यांनी ‘भ्याडपणाचे कृत्य’ असे या हल्ल्याचे वर्णन केले. त्यांनी या दुर्घटनेचा चौकशी अहवाल पोलीस प्रमुखांकडून तातडीने मागवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनीही या हल्ल्याचा निषेध करून, मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना श्रद्धांजली वाहून  शोक व्यक्त केला.

या हल्ल्याची जबाबदारी तात्काळ कोणत्याही गटाने स्वीकारली नसली तरी, जिल्ह्यातील पोलिसांवर यापूर्वी झालेल्या हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) घेतली होती. २००७ मध्ये अनेक दहशतवादी संघटनांचा संघ म्हणून स्थापन झालेल्या ‘टीटीपी’ने जूनमध्ये सरकारबरोबरचा ‘युद्धबंदी करार’ मागे घेतला. त्यांनी  देशभरात हल्ले करण्याचे आदेश दिले आहेत.