Delhi Fire: राजधानी दिल्लीत सोमवारी एक भयंकर प्रसंग घडला. राजा गार्डन परिसरात असलेल्या महाजन इलेक्ट्रॉनिक्स शोरूममध्ये दुपारी अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने विक्राळ रुप धारण केले आणि त्यात शोरूममध्ये काम करणारे कर्मचारी फसले. यात चार तरूण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर एक कर्मचारी गंभीर जखमी आहे.
दिल्लीच्या दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयाच्या शवागारात मृत्यमुखी पडलेल्या चार तरुणांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी आणले गेले होते. त्यांचे कुटुंबिय शवागाराबाहेर आपल्या मुलांच्या पार्थिवाची वाट पाहत बसले होते. बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. आग लागल्याप्रकरणी दुकानाच्या मालकाला जामीन मिळाला असून तो सुटला आहे. त्यामुळे कुटुंबियांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
अमनदीप कौर (२२) या मुलीचे वडील जगजीत सिंग हे द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले, “आम्हाला फक्त दुकानाच्या मालकाशी एकदा बोलू द्या. आम्ही त्यांना मारणार नाहीत. आम्हाला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे. आमच्या मुलांची काय चूक होती? त्यांना का मारले? चार कोवळ्या मुलांची हत्या करणाऱ्याला पोलिसांनी का सोडले? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मी मुलीवर अंत्यसंस्कार करणार नाही.”
इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला लागलेल्या आगीत अमनदीप कौरसह पायल (२०), आयुषी (२२) आणि रवी (२८) यांचा गुदमरून मृत्यू झाला. पाचवा कर्मचारी संदीप (२५) अजूनही रुग्णालयात असून त्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांचे पार्थिव तरी दाखवा
पायलची बहीण वंदनाही शवागाहेर बसली होती. ती म्हणाली, आम्ही सकाळी ७.३० वाजल्यापासून वाट पाहत आहोत. तरीही माझ्या बहिणीला पाहू दिले नाही. तिच्या शेजारीच तिची आई बसली होती. तिचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. हतबल होऊन ती म्हणाली, शवविच्छेदन करण्यापूर्वी कमीत कमी तिचे पार्थिव तरी पाहू द्यायचे होते.
पायलच्या बहिणीने सांगितले की, ती दीड महिन्यांपासून या दुकानात काम करत होती. मागच्या वर्षी तिच्या वडिलांचे मधुमेहामुळे निधन झाले. तिची आईही विविध आजारांनी ग्रासलेली आहे. त्यामुळे पायलने एवढ्या कमी वयात नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आगीबाबत पीसीआर कॉल आला. दिल्ली अग्निशमन दलाच्या पाच गाड्या लगेच घटनास्तळी तैनात करण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दुकानात पाच जण अडकले आहेत. अथक प्रयत्नानंतर पाचही जणांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त विचित्र वीर यांनी दिली.
दुकान मालकावर बीएनएसच्या कलम १०६ (निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे) आणि कलम २८७ (आग किंवा ज्वलनशील पदार्थांशी निष्काळजीपणाचे वर्तन) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.