French President Emmanuel Macron and wife Brigitte: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहेत. मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट या ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप अमेरिकेतील अति-उजव्या विचारसरणीच्या भाष्यकार, लेखिका कॅन्डेन्स ओवेन्स यांनी केला होता. त्यांच्या दाव्यांना खोडून काढण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट अमेरिकेच्या न्यायालयात फोटो आणि इतर वैज्ञानिक पुरावे सादर करण्याची योजना आखत आहेत.

उजव्या विचारसरणीच्या राजकीय भाष्यकार असलेल्या ओवेन्स यांच्या युट्यूब चॅनेलचे सुमारे ४५ लाख सबक्राइबर्स आहेत. फ्रान्सच्या प्रथम महिला नागरिक ब्रिजिट मॅक्रॉन या जन्मतः पुरूष होत्या, त्यांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी लग्न करण्यापूर्वी लिंगबदल केला, असा आरोप ओवेन्स यांनी वारंवार केला आहे.

७२ वर्षीय ब्रिजिट मॅक्रॉन या तीन मुलांच्या आई आहेत. त्यांनी ओवेन्स यांचे आरोप निधारार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे.

मॅक्रॉन जोडप्याचे वकील टॉम क्लेअर यांनी बीबीसीच्या फेम अंडर फायर पॉडकास्टला मुलाखत देताना सांगितले की, ब्रिजिट मॅक्रॉन यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच हे आरोप बिनबुडाचे असून अस्वस्थ करायला लावणारे आहेत, असे म्हटले. टॉप क्लेअर पुढे म्हणाल्या, मॅक्रॉन दाम्पत्य जागतिक पातळीवरील महत्त्वाचे लोक आहेत. तसेच तेही माणसे आहेत. त्यांच्याविरोधात वैयक्तिक आरोप करून त्यांना बदनाम केल्याचा प्रकार आक्षेपार्ह आणि वेदनादायी आहे.

मॅक्रॉन २००७ साली विवाहबद्ध झाले होते. क्लेअर यांनी सांगितले की, मॅक्रॉन कुटुंब तज्ज्ञांच्या साक्षी आणि कुटुंबातील छायाचित्रांद्वारे हे दावे खोटे आहेत, हे सिद्ध करण्यास तयार आहे.

मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांच्या वयात २५ वर्षांचे अंतर

२००७ साली मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांचे लग्न झाले. त्यावेळी इमॅन्युएल २९ वर्षांचे होते आणि ब्रिजिट ५४ वर्षांच्या होत्या. यावेळी ब्रिजिट यांची तीन मुलेही लग्नाला उपस्थित होती. दोघांची प्रेमकहाणी १९९३ साली फ्रान्समधील अमिएन्स शहरात सुरू झाली, जेव्हा मॅक्रॉन फक्त १५ वर्षांचे होते आणि ब्रिगिट ३९ वर्षांच्या होत्या. त्या शाळेत शिक्षिका होत्या. शाळेत असतानाच मॅक्रॉन यांना ब्रिजिट यांच्याबद्दलचे आकर्षण निर्माण झाले आणि नंतर त्यांचे नाते निर्माण झाले.

सुरुवातीला मॅक्रॉन आणि ब्रिजिट यांच्या नात्यावर बरीच टीका झाली. वयातील फरक, शिक्षक-विद्यार्थी नाते चर्चेचा विषय ठरले. पण कालांतराने फ्रान्सच्या लोकांनी हे नाते स्वीकारले.