पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना ‘ही युद्धाची वेळ नव्हे’ असा सल्ला दिल्याने जगभरातून त्यांचं कौतुक होत आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट झाली. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) २२वी वार्षिक परिषदेच्या निमित्ताने झालेल्या द्विपक्षीय चर्चेत मोदींनी युक्रेन युद्धाबाबत चिंता व्यक्त केली. दरम्यान मोदींच्या या भूमिकेचं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी स्वागत केलं आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७७ व्या अधिवेशनात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. मोदींनी जेव्हा पुतीन यांना सांगितलं, ‘ही युद्धाची वेळ नाही’ ते योग्य होते असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.

इमॅन्युएल मॅक्रॉन काय म्हणाले ?

“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही युद्धीची वेळ नाही सांगणं अत्यंत योग्य आहे. ही बदला घेण्याची किंवा पाश्चिमात्य विरुद्ध आशियाई देश असा विरोध करण्याची वेळ नाही. आपल्यासमोर असलेल्या आव्हानांना एकत्रितपणे सामोरे जाण्याची हीच वेळ आहे,” असं इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे.

ही युद्धाची वेळ नव्हे! ; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना सल्ला

“उत्तर आणि दक्षिण दरम्यान एक प्रभावी करार विकसित करण्याची तातडीची गरज आहे, जो अन्न, जैवविविधतेसाठी, शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल,” असंही ते पुढे म्हणाले.

युक्रेनमधील संघर्षाबद्दल बोलताना मॅक्रॉन म्हणाले, “रशिया आज दुटप्पी भूमिका घेत आहे. पण युक्रेनमधील युद्ध हा असा संघर्ष नसावा, ज्यामध्ये एखाद्याला उदासीन राहावं लागेल”.

मोदी काय म्हणाले होते?

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे आव्हान सध्या जगासमोर आहे. करोना महासाथ आणि युक्रेनमधील संघर्षांमुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. परिणामी, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा संकट निर्माण झाले आहे. त्यासाठी लवचीक पुरवठा साखळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तम संपर्क यंत्रणा आणि देशादेशांतील परस्पर आयात-निर्यातीची प्रक्रियाही सुलभ करणे महत्त्वाचे आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुतीन काय म्हणाले होते?

युद्धाबाबतची तुमची (मोदी) चिंता मी समजू शकतो. युद्ध लवकरात लवकर संपवण्याची आमचीही इच्छा आहे. मात्र युक्रेनने चर्चेत रस दाखवलेला नाही.